Adv Gunratna Sadavarte यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची मालिका सुरुच, आतापर्यंत कुठे कुठे गुन्ह्याची नोंद?

0
29

सोलापूर : अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची मालिका सुरुच आहे. मुंबई, सातारा, कोल्हापूर, अकोल्यानंतर आता सोलापुरातही गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

मराठा आरक्षणाच्या निकालाबाबत अवमान केल्याने सोलापुरात गुन्हा
आता सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मराठा आरक्षणाच्या निकाला संदर्भात न्यायालयाच्या निकालाचा अवमान केल्याबद्दल आणि दोन समाजात तेढ निर्माण करणारे चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी छावा संघटनेचे शहराध्यक्ष योगेश पवार यांच्या तक्रारीनंतर गुन्ह्याची नोंद झाली आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात हे वक्तव्य केल्याचा पुरावा देत कलम 153अ, 153 ब, 500, 505 (1), 505 (2), न्यायालय अवमान अधिनियम 1971 कलम 2 अनुसारगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिसात गुन्हा
अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल, एकोप्याला बाधा येईल अशी कृती केल्याप्रकरणी त्यांच्यावर भा.द.वि.स कलम 153 (अ) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वीच मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती. मराठा आरक्षण विरोधी न्यायालयीन लढा लढण्यासाठी सदावर्ते यांनी बेकायदेशीरपणे पैसे जमवण्याचा तसंच  उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत अखेर कोल्हापुरात सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.

अकोल्यात फसवणुकीचा गुन्हा
अकोल्यात अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्यासह त्यांची पत्नी अॅड जयश्री पाटील यांच्याविरोधात अकोट शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. एसटी आंदोलनात एसटी कर्मचाऱ्यांकडून अवैधपणे पैसे जमा केल्याबद्दल हा गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेनाप्रणित महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी यासंदर्भात 8 जानेवारी 2022 रोजी अकोट पोलिसात तक्रार दिली होती. तब्बल चार महिन्याच्या विलंबानंतर सदावर्तेंसह चार जणांवर गुन्हे दाखल झाला आहे. अकोटमधील कर्मचाऱ्यांकडून 74 हजार 400 रुपये सदावर्तेंकडे जमा करण्यात आल्याचं मालोकार म्हणाले. हे पैसे औरंगाबादेतील अजयकुमार गुजर यांच्यामार्फत सदावर्तेंपर्यंत पोहोचवण्यात आल्याचे पुरावे मालोकार यांनी पोलिसांना दिले आहेत.

छत्रपतींच्या वारसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी साताऱ्यात गुन्हा 
छत्रपती शिवरायांच्या वारसाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी साताऱ्यात अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दोन वर्षांपूर्वी अॕड. गुणरत्न सदावर्ते यांनी एका खाजगी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी छत्रपती उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे संभाजीराजे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त भावना तयार झाल्या होत्या. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात राजेंद्र निकम यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुणरत्न सदावर्ते यांच्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. शरद पवार यांच्या बंगल्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अॅड गुणरत्न सदावर्तेला अटक करण्यात आली. जर त्यावेळी अटक झाली असती तर सिल्वर ओकवरील हल्ला झाला नसता अस मत फिर्यादी निकम यांनी व्यक्त केलं.

साताऱ्यात जामीन, मुंबई कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी आंदोलनप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना 8 एप्रिल रोजी मुंबईत अटक झाली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पण त्याच दरम्यान साताऱ्यात सदावर्तेंवर गुन्हा झाल्याने त्यांना सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. सातारा न्यायालयाने सोमवारी (18 एप्रिल) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांना मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात आणण्यात आलं आहे. आज त्यांना मुंबईतील गिरगाव न्यायालयात हजर करण्यात आलं. त्याचवेळी सातारा न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. मात्र गिरगाव कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यातच कोल्हापूर आणि अकोट पोलीसही गुणरत्न सदावर्ते यांच्या ताब्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे सध्यातरी विविध जिल्ह्यात सदावर्ते यांची ‘हवा’पालट होताना दिसत आहे.