4 जिल्ह्यात घरफोडी व मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीला अटक

0
27

तिरोडा, दि.29 : गोंदिया, बालाघाट, भंडारा, नागपूर जिल्ह्यात मोटरसायकल चोरी करून त्याद्वारे घरफोडीचे सतत गुन्हे करणार्‍या टोळीला मोठ्या शिताफीने तिरोडा पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत 2 चोरीच्या मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत. सदर टोळीकडून परिसरातील  बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.सविस्तर वृत्त असे की, मागील काही दिवसात तिरोडा परिसरात मोटरसायकल चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यात वाढ झालेली होती. त्यामुळे तिरोडा पोलिसांना माहिती मिळाली की, परिसरात सक्रिय टोळी फिरत आहे. सदर टोळीच्या मागे तिरोडा पोलीस मागील एक महिन्यापासून लागलेले होते. या टोळीचे सदस्य फकीरटोली काचेवानी येथील समजले. त्यानुसार तिरोडा पोलिसांनी जनतेला सतर्क करून त्या भागात जास्त लक्ष केंद्रित केले आहे.

28 मे 2022 रोजी संतोष चंदनलाल हरिणखेडे (वय 26) रा. मजितपूर यांनी आपली हिरो होंडा मोटरसायकल फकीरटोली-काचेवानी येथे रोडच्या कडेला उभी करून शौचास गेले. त्या दरम्यान त्यांची मोटरसायकल चोरी गेल्याची माहिती तिरोडा पोलिसांना फोनद्वारे मिळाली.

त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी सोबत पोलीस हवालदार मुकेश थेर, बावणे, नायक पोलीस शिपाई रक्षे, सवालाखे, प्रशांत कहलकर, चालक पोलीस शिपाई शेख, चोपकर, दमाहे यांनी त्या भागात लोकांच्या मदतीने शोध मोहीम सुरु केले. त्यावेळी शेतात खोलगट भागात झाडाखाली 4 व्यक्ती मोटरसायकलच्या नंबर प्लेटमध्ये खाडाखोड करताना दिसले. त्यांना घेराव करून पोलिसांनी पकडले आहे.

यात आरोपींमध्ये (1)अजय ताराचंद कनोजे (वय 28) रा. बिरसी, (2)गोलू इसूपखा पठाण (वय 30), (3) अनिल भट्टीलाल कुंभरे  (वय 30), (4) रोशन प्यारेलाल राऊत (वय 35) सर्व रा. फकीरटोली-काचेवानी यांचा समावेश आहे.

त्यांच्याजवळून (1) एक आई स्मार्ट स्प्लेंडर हिरो कंपनीची मोटार सायकल क्रमांक एमएच 40/ए व्ही 0853 कि. 40 हजार रुपये, (2) एक एस्ट्रीम हिरो कंपनीची मोटारसायकल क्रमांक एमएच 49/एएक्स 6479किं. 70 हजार रुपये असा एकूण 1 लाख 20 हजार रूपयांचा मुद्देमाल मिळून आलेला आहे.आरोपी अजय कनोजे हा मोटरसायकल चोरी, घरफोडीचे गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार आहे. त्यांनी गोंदिया, बालाघाट, भंडारा, नागपूर या जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. सदर टोळीकडून तिरोडा परिसरातील बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.