अमरावतीतही उदयपूरसारखाच मर्डर:नुपूर शर्मांची पोस्ट व्हायरल केल्यानेच हत्या

0
32

अमरावती,दि,02ः महाराष्ट्रातील अमरावती येथील फार्मासिस्ट उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास वेगवान झाला आहे. याप्रकरणी अमरावतीचे डीसीपी उमेश साळवी यांनी पत्रकार परिषदेत हत्येचे कारण स्पष्ट केले आहे. मेडिकल चालक उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मा यांची पोस्ट व्हायरल केल्यानेच झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उदयपूरमधील कन्हैयालालच्या हत्येप्रमाणेच उमेश कोल्हेचीही हत्या झाली. 21 जून रोजी अमरावती महाराष्ट्रातील उमेश कोल्हे यांची हत्या झाली होती. या प्रकरणाचा तपास गृह मंत्रालयाने एनआयएकडे सोपवला आहे. मंत्रालयाच्या निवेदनानुसार हत्येमागील कट, संघटनांचा सहभाग आणि आंतरराष्ट्रीय संबंधांची कसून चौकशी केली जाईल. राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए आणि एटीएसचे पथक अमरावतीत पोहोचले आहे.

नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिल्याने फार्मासिस्ट उमेश कोल्हे यांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला होता. भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत टिप्पणी केलेल्या पोस्ट शेअर केल्याप्रकरणी उमेश कोल्हे त्यांची हत्या केली असावी, असा संशय भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी वर्तवला आहे.

कधी झाली होती हत्या?

उमेश कोल्हे हे मंगळवार दि.21 जून रोजी रात्री तहसील कार्यालय परिसरातील आपले मेडिकल स्टोअर्स बंद करून मुलगा संकेत (27) व सून वैष्णवी यांच्यासोबत वेगवेगळ्या दुचाकीने घरी जात होते. मार्गात न्यू हायस्कूल मेन समोरील गल्लीत तिघांनी लूटमारीच्या उद्देशाने उमेश यांना अडवून चाकूने गळ्यावर वार करून त्यांची हत्या केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, उमेश कोल्हेच्या हत्येची योजना आठवडाभरापासून आखली जात होती. 54 वर्षीय कोल्हे यांनी नूपुर शर्माच्या वादग्रस्त विधानाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केल्या होत्या.