विधानसभा अध्यक्ष निवडणूक:शिवसेनेच्या सर्व आमदारांना सुनील प्रभूंकडून व्हीप जारी

0
39

; राजन साळवींना मतदान करण्याचे आदेश

मुंबई,दि.02ः  राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे. आमदार सुनील प्रभू यांच्याकडून हा व्हीप जारी जारी करण्यात आले आहे. महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी यांनी उमेदवारी दिली असून, साळवी यांनाच मतदान करा, असे आदेश शिवसेना आमदारांना देण्यात आले आहे. शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री पद मिळालेले एकनाथ शिंदे यांना देखील हे व्हीप जारी करण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर त्यांची विधीमंडळ गटनेते पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्या जागेवर अजय चौधरींची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आता सुनील प्रभू यांनी एक व्हीप जारी केले असून, उद्या म्हणजेच 3 तारखेला विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. त्यासाठी महाविकास आघाडी कडून राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानूसार त्यांनाच मतदान करण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहे.

आदेशांचे पालन होणार का?

एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या 40 हून अधिक आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी केली होती. त्यामुळे राज्यात सत्तांतर झाले आहे. एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत युती केली असून, शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री झाले आहेत. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त ठेवण्यात आली होती. मात्र, आता विधानसभा अध्यक्षपदाची उद्या निवडणूक होणार आहे. त्यासाठी शिवसेनेने व्हीप जारी केला असून, बंडखोरी आमदार शिवसेनेचा आदेश मानणार का? हे पाहावे लागणार आहे. उद्या सभागृहामध्ये शिंदे गट आणि शिवसेना गट आमने-सामने पाहायला मिळणार आहे. कारण, बंडखोर आमदार म्हणत आहेत की, आमचे नेते एकनाथ शिंदे हेच आहेत.