लूटमार करून केला दुचाकीस्वाराचा खून; १ जण गंभीर जखमी

0
66

सालेकसा,दि.11 : आमगाववरून सालेकसाला जात असलेल्या मोटारसायकल स्वार दोघांना पानगाव येथील तलावाजवळ अडवून लुटमार करणाऱ्या तीन आरोपींनी मोटारसायकल स्वार युवकांना काठीने बेदम मारहाण केल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. आरोपींनी मोटारसायकल स्वार युवकांचे पैसे घेऊन घटनास्थळावरून पसार झाले. ही घटना रविवारी (दि.९) रात्रीच्या सुमारास घडली. गोपाल गणपत बावनकर (३८) रा. निंबा असे खून झालेल्या युवकाचे तर विश्वनाथ बाळकृष्ण मोटघरे (४६) रा. सालेकसा असे गंभीर झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार सालेकसा येथील व्यावसायिक भाऊराव मोटघरे यांचा लहान भाऊ विश्वनाथ बाळकृष्ण मोटघरे हे भंडारावरून अहमदाबाद एक्स्प्रेसने आमगावपर्यंत आले. दरम्यान गोपाल गणपत बावनकर हा चंद्रपूरवरून गोंदियापर्यंत आला. त्यानंतर त्यानेसुद्धा अहमदाबाद एक्स्प्रेसने आमगावपर्यंत तिकीट काढली. तो आमगाव येथे उतरला असता गोपाल बावनकरने विश्वनाथ मोटघरेला सालेकसापर्यंत लिफ्ट मागितली.

दोघेही टी.व्ही.एस. स्पोर्ट्स या मोटारसायकलने रात्री ९ वाजताच्या दरम्यान सालेकसाकडे जायला निघाले. दरम्यान त्यांना पानगाव तलावजवळ एका युवकाने थांबविले. थांबताच एकाएक काठीने मारण्यास सुरवात केली. ५ ते ६ वार विश्वनाथ मोटघरेने आपल्या हाताने थांबविले; पण दोन युवकांनी मागेहून डोक्यावर वार केले त्यात विश्वनाथ खाली पडला. त्याला पाहून गोपाल पळायला लागला. त्याला पळताना पाहून त्या तिन्ही युवकांनी त्याच्या डोक्यावर काठीने बेदम मारहाण केली. यात गोपाल बावनकरचा जागीच मृत्यू झाला. यानंतर विश्वनाथ मोटघरेची मोटारसायकल, मोबाइल व जवळ असलेले ७०० रुपये घेऊन आरोपींनी आमगाव मार्गाने पळ काढला.

हल्ला करणारे आरोपी तरुण

विश्वनाथ मोटघरे यांनी दिलेल्या माहितीवरून हल्लेखोर हे २० ते २५ वर्ष वयोगटातील आहेत. ते कोण असावेत व कुठले असावेत याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर करीत आहेत.

घटनेमुळे परिसरात खळबळ

आमगाव-सालेकसा या सतत रहदारीच्या रस्त्यावर लोकांचा वाहनांची रात्र दिवस ये-जा सुरू असते. दरम्यान याच मार्गावर लूटमार करून युवकाचा खून करण्यात आल्याने परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली आहे.विश्वनाथ मोटघरेला जखमी अवस्थेत सालेकसा येथील रुग्णालयात दाखल केले. त्याला डोक्यावर जबर मार लागला आहे. गंभीर जखमी झालेल्या विश्वनाथला रात्रीच गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी भिसे, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, सायबर सेलचे प्रभारी अधिकारी महादेव सिद, फिंगरप्रिंट व डॉग स्कॉड नितीन थुल, सालेकसा पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर, सहायक पोलीस निरीक्षक शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल मुंडे घटनास्थळी पोहचत पंचनामा करून तपास कार्याला सुरुवात केली.