रानटी डुकराच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू

0
42

चंद्रपूर- बल्लारपूर बामणी(दु.)कडून पळसगाव-कळमना जिल्हा परिषद शाळेत दुचाकीने शिक्षक पत्नीसह जात असताना दहेली गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर रानटी डुक्कराने धडक दिली. त्यात शिक्षक सुनील पत्रू कोवे जागीच ठार झाले. तर त्यांची पत्नी शालिनी कोवे गंभीर जखमी झाल्या आहेत. सदर घटना शनिवार, १५ ऑक्टो.ला सकाळी ७.३0 वाजताच्या दरम्यान घडली.
बल्लारपूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पळसगाव व कळमना जिल्हा परिषद शाळेत सुनील कोवे व त्यांची पत्नी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शनिवार, १५ ऑक्टो.ला सकाळी शाळेत जाण्याकरिता आपली दुचाकी क्र. एम. एच. ३४ / ए. एस. ४६१९ ने बामणी (दु.)कडून पळसगावकडे जात असताना दहेली गावाच्या नाल्याजवळ बामणी-गोंडपिपरी या राष्ट्रीय महामार्गावर सकाळी ७.३0 च्या दरम्यान शेतातून सुसाट धावत सुटलेल्या रानटी डुक्कराने दुचाकीस जोरदार धडक दिली. त्या धडकेत सुनील कोवे (वय ४९) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी शालिनी कोवे गंभीर जखमी झाल्या असून, त्यांचेवर चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर अपघाताची माहिती मिळताच बल्हारपूर पोलिस घटनास्थळ गाठून जखमी पत्नीला उपचारासाठी चंद्रपूरला रवाना केले. व मृतक सुनील कोवे यांचा मृतदेह बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी रवाना केले. या घटनेची माहिती बल्लारशाह वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांना देण्यात आली. त्यांनी घडनास्थळ गाठून मोका पंचनामा व चौकशी केली आहे.
सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील कार्यात सतत अग्रेसर असणार्‍या कवी मनाच्या सुनील कोवे यांच्या अकाली निधनाने पळसगाव शाळा व परिसरात शोककळा पसरली असून, सर्वत्र दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्‍चात त्यांच्या पत्नी, दोन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.