स्वच्छ व सुंदर गावाची संकल्पना, स्वयंप्रेरणेने युवा वर्गाने ग्राम सफाईतून दिला आरोग्याचा संदेश

0
16

तिरोडा : तालुक्यातील ग्राम चिरेखनी येथे शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य अबाधित रहावे तसेच शालेय व बुद्ध विहार परिसरात सरपटणार्‍या जीवांपासून धोका उद्भवू नये, या उद्देशाने ग्राम चिरेखनी येथे युवा वर्गाने स्वयंप्रेरणेने दोन दिवसपर्यंत स्वच्छता अभियान राबविले. तसेच स्वच्छ व सुंदर गावाच्या संकल्पनेसाठी ग्राम सफाईतून आरोग्याचा संदेश दिला.

सविस्तर असे की, ग्राम चिरेखनी येथे जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा आहे. या शाळेत वर्ग पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेच्या आवार भिंतीला लागूनच बुद्ध विहार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. या पुतळ्याच्या बाजूला असलेल्या जागेवर महामानव बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे नवनिर्माण होणार आहे. मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत व केरकचरा साचला होता. तसेच जिल्हा परिषद शाळेच्या संपूर्ण आवार भिंतीच्या शेजार परिसरात मोठ्या प्रमाणात गवत उगवले होते. शिवाय केरकचरा सुद्धा जमा झाला होता. त्यामुळे विद्यार्थी, नागरिक व ये-जा करणार्‍यांना त्रास होत होता. शिवाय सरपटणार्‍या जीवांपासून धोका सुद्धा उद्भवू शकत होता.

ग्राम चिरेखनी येथील युवा वर्गाला ही समस्या लक्षात आली. त्यांनी स्वयंप्रेरणेने दोन दिवसपर्यंत स्वच्छता अभियान राबवून या परिसरातील संपूर्ण गवत काढले, केरकचरा जमा करून त्याची विल्हेवाट लावली. त्यामुळे आता हे परिसर स्वच्छ व सुंदर दिसत आहे.

सदर स्वच्छता अभियानात प्रामुख्याने आनंदराव ओघरे, संजय राऊत, देवेंद्र ओघरे, श्याम ठाकरे, प्यारेलाल चचाने, उजेलाल चचाने, मनोहर पारधी, शैलेन्द्र वालदे, आशीष शहारे, ज्येष्ठ नागरिक वासुदेव शहारे आदि अनेकांचा सहभाग होता. स्वच्छता अभियान राबविल्याबद्दल गावातील वयोवृद्ध नागरिकांनी युवा वर्गाचे कौतुक केले.