ब्लॅकमेल करणार्‍या तरुणीच्या त्रासामुळे तरुणाची गळफास घेत आत्महत्या

0
47

भंडारा-पैशासाठी सतत ब्लॅकमेल करणार्‍या तरुणीच्या तगाद्यापायी एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना साकोली तालुक्यातील उमरी/मोहघाटा जंगलात उघडकीस आली. याप्रकरणी तरुणीसह तिला सहकार्य करणार्‍या तरुणाविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
राजेश रामकृष्ण वाघाडे (वय ३२) रा. उमरी/लवारी ता. साकोली असे मृतकाचे नाव आहे. राजेशचे त्याच्या लग्नापुर्वी अस्मिता सीताराम भोयर (वय २३) रा. कोसबी, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया हिच्यासोबत मैत्री होती. दरम्यान, राजेशचे लग्न झाले. लग्नानंतरही अस्मिता ही राजेशला वारंवार पैशाची मागणी करीत होती. याच त्रासाला कंटाळून ८ ऑक्टोबर रोजी राजेश हा घरी कुणालाही न सांगता निघून गेला. तो बेपत्ता असल्याची तक्रार साकोली पोलिसात नोंदविण्यात आली होती. दरम्यान, १0 ऑक्टोबर रोजी उमरी/मोहघाटा जंगलात गुराख्यांना राजेशचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. त्याच्या पाठीवरील पिशवीची तपासणी केली असता सुसाईट नोट मिळाली. त्यात अस्मिता भोयर हिने पैशांसाठी नेहमी मानसिक त्रास दिला. तर तिलक ठाकरे (वय २७) रा. लाखांदूर रोड, साकोली याने तिला पाठींबा दिला. तसेच माझ्या परिवाराला बर्बाद करेन, अशी धमकी दिली. हा त्रास सहन न झाल्याने आत्महत्या करत असल्याचे त्याने चिठ्ठीत नमूद केले आहे. याप्रकरणी साकोली पोलिसांनी अस्मिता आणि तिलक ठाकरे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक खोकले करीत आहेत.