उके बंधूंना न्यायालयीन कोठडी , ऑर्थर रोड कारागृहात रवानगी

0
12

मुंबई-जमिनीच्या प्रकरणात महिलेला पिस्तूल दाखवून धमकी दिल्याप्रकरणी बुधवारी ॲड. सतीश उके आणि प्रदीप उके यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने उके बंधूंची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. याप्रकरणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलीस कोठडीची गरज नसल्याचे नमूद करीत उके बंधूंची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

उके बंधू सध्या ‘ईडी’ कोठडीत मुंबईतील ऑर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात आहेत. अजनी हद्दीतील एका जमिनीप्रकरणी उके बंधूंनी फिर्यादी महिलेला पिस्तूल दाखवून धमकी दिली. त्यामुळे महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी नागपूर शहर पोलिसांनी उके बंधूंना ऑर्थर रोड कारागृहातून पोलीस कोठडीच्या मागणीकरिता न्यायालयात हजर केले. मात्र, जिथून उके बंधूंना आणले त्या ठिकाणीच त्यांना घेऊन जावे, असा आदेश न्यायालयाने दिला.

या प्रकरणात न्यायालयात आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे न्यायालयाने पोलीस कोठडीची गरज नसल्याचे नमूद करीत उके बंधूंची ऑर्थर रोड कारागृहात परत न्यायालायीन कोठडीअंतर्गत रवानगी केली. न्यायालयात ॲड. सतीश उके यांनी स्वत:च आपली बाजू मांडली. प्रदीप उकेतर्फे ॲड. शशीभूषण वाहणे, ॲड. वैभव जगताप, तर सरकारतर्फे ॲड. सुबोध धर्माधिकारी यांनी बाजू मांडली.