मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांचे ज्ञानदीप अकादमीशी संबंध! ; ‘महाज्योती’च्या प्रशिक्षण केंद्र वाटपात नवा खुलासा

0
18

नागपूर : ‘महाज्योती’ने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी ज्ञानदीप अकादमी, पुणेला दिलेले कंत्राट आधीच वादात सापडले असताना आता इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत खेडेकर यांच्या काही पुस्तकांचे प्रकाशन ज्ञानदीप अकादमीने केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कंत्राट देताना ज्ञानदीपला झुकते माप देत यामध्ये गौडबंगाल झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात ‘स्टुडंट राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (महाज्योती) यंदा ‘एमपीएससी’च्या पूर्व प्रशिक्षणासाठी दीड हजार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या प्रशिक्षणासाठी  ज्ञानदीप अकादमीची निवड करण्यात आली. मात्र, यंदा एमपीएससीने पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल केल्याने विद्यार्थ्यांना वैकल्पिक विषय निवडीसाठी अडचण नको म्हणून प्रशिक्षणासाठी किमान तीन विषयांचा पर्याय द्यावा अशी मागणी होती. मात्र, त्यानंतरही तब्बल दीड हजार विद्यार्थ्यांचे कंत्राट एकाच संस्थेला देण्यात आल्याने अनेक शंका उपस्थित केली जात आहे.   स्टुडंट राईट्सने केलेल्या तक्रारीनुसार, खुद्द बहुजन कल्याण मंत्री आणि ‘महाज्योती’च्या संचालक मंडळाचे अध्यक्ष अतुल सावे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत खेडेकर यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन  ज्ञानदीप अकादमीने केले आहे. यात ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५’ आणि ‘महसूल विभागीय परीक्षा’ या पुस्तकांचा समावेश आहे. याशिवाय खेडेकर यांनी ज्ञानदीप अकादमीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले आहे.  ज्ञानदीपचे प्रमुख उमेश शिंदे यांच्यासोबत खेडेकर यांची काही छायाचित्रेही आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा एकाच संस्थेमध्ये प्रशिक्षणाला विरोध असतानाही मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक आणि त्यांचे ज्ञानदीपशी असलेले संबंध हे कंत्राट देण्यासाठी कारणीभूत ठरल्याचा आरोप होत आहे.

खेडेकर यांचा प्रतिसाद नाही

प्रशांत खेडेकर यांना याबाबत विचारणा करण्यासाठी दूरध्वनी माध्यमातून अनेकदा संपर्क करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

मध्यस्थी कुणी केली?

‘महाज्योती’ने ज्ञानदीप अकादमीवर स्थगिती घालून नंतर चार दिवसात ती उठवली. यासाठी कुठलेही ठोस कारण न देता स्थगिती देणे, चार दिवसांनी ती उठवणे या सगळय़ाच बाबी शंका उपस्थित करणाऱ्या असल्याने या संपूर्ण प्रकरणात मध्यस्थाची भूमिका पार पाडणारा कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.प्रशिक्षणासाठी संस्थांचा पर्याय द्यावा, अशी मागणी असतानाही महाज्योतीने एकाच संस्थेला कंत्राट दिले. याला विद्यार्थ्यांचा प्रचंड विरोध असून काहीतरी गौडबंगाल दिसून येते. याशिवाय प्रशांत खेडेकरांसंदर्भात समोर आलेले पुरावे शंका उपस्थित करणारे आहेत.

– उमेश कोर्रामस्टुडंट राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया.

ज्ञानदीपला कंत्राट देण्याशी माझा काहीही संबंध नाही. त्यांना मी मंत्री नसतानाच कंत्राट देण्यात आले होते. याशिवाय प्रशांत खेडेकर यांनी ज्ञानदीपसाठी लिहिलेली पुस्तके ही आठ वर्षांआधीची आहेत. ते माझ्याकडे आता रूजू झाले. ते ‘एमपीएससी’ उत्तीर्ण झाले असताना आठ वर्षांआधी त्यांनी ही पुस्तके ज्ञानदीपसाठी लिहिली होती. त्याचा ज्ञानदीपला कंत्राट देण्याशी काहीही संबंध नाही.

 अतुल सावेमंत्रीइतर मागास बहुजन कल्याण.