मंत्रालय बोगस लिपिक मुलाखती :’त्या’ मुलाखती सामान्य प्रशासन उपसचिवांच्या केबिनमध्येच

0
25

मुंबई :- मंत्रालयातील बोगस लिपिक भरती रॅकेटमधील पसार आरोपी महेंद्र सकपाळलाही गुन्हे शाखेच्या कक्ष सहाने बेड्या ठोकल्या आहेत.राज्यभरातील तरुण या रॅकेटच्या जाळ्यात फसल्याचा संशय असून त्यानुसार, गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सामान्य प्रशासन उपसचिवांच्या केबिनमध्येच उमेदवारांच्या मुलाखती घेतल्याचे समोर आले आहे.

गुन्हे शाखेच्या कक्ष ६ ने आतापर्यंत मंत्रालयात शिपाई पदावर असलेल्या सचिन डोळस याच्यासह महादेव शिरवाळे, नितीन साठे यांना अटक केली आहे. बुधवारी सकपाळलाही अटक करण्यात आली. तो इस्टेट एजेंट म्हणून काम करतो, तर शिरवाळे हा दलाल म्हणून काम करतो. सकपाळच्या संपर्कातूनच ही मुले या टोळीच्या जाळ्यात अडकली होती. सध्या चारही जण २७ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत आहेत.

सचिन डोळसने २०१९ मध्ये मंत्रालयातील ६ व्या मजल्यावर असलेल्या उपसचिवांकडे शिपाई पदावर कार्यरत असताना हा प्रताप केल्याची माहिती समोर येत आहे. तत्कालीन उपसचिवांच्या गैरहजेरीत तो नितीन साठेला सचिव असल्याचे भासवून त्यांच्या केबिनमध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेत होता. उपसचिवांना बढती मिळाल्यानंतर, डोळसला सातव्या मजल्यावर हलवण्यात आले. त्याच्याविरोधात कारवाई करण्याची प्रक्रियाही सुरू झाल्याचे समजते आहे. साठे हा खासगी कंपनीत नोकरीला आहे.

तुमचीही फसवणूक झाली आहे का?

या रॅकेटच्या जाळ्यात तुमचीही फसवणूक झाली असल्यास तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. आतापर्यंत ११ तक्रारदार पुढे आले आहेत.