23.5 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home गुन्हेवार्ता अज्ञात आरोपींनी जाळल्या दुचाकी

अज्ञात आरोपींनी जाळल्या दुचाकी

0
18
रेलटोली परिसरातील घटना; शेजारची दुकानेही जळाली 
गोंदिया, ता. १६ ः अज्ञात दोन आरोपींनी पेट्रोल टाकून चार दुचाकी जाळल्याची घटना सोमवारी (ता. १६) पहाटे चारच्या सुमारास रेलटोली येथील गुजराती नॅशनल शाळेसमोर घडली. उल्लेखनीय म्हणजे, दुचाकींच्या आगीची धग शेजारच्या दुकानांमध्येही पोहोचून दोन दुकाने जळाले. या घटनेतील आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले असून, रामनगर पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

 पॅसिफिक हॉटेलमधील कामगारांच्या या दुचाकी असल्याची माहिती आहे. सोमवारी पहाटे पॅसिफिक हाॅटेल येथील सुरक्षा रक्षकाला काही तरी जळाल्याचा वास आल्यामुळे त्यांनी बाहेर निघून बघितले. यावेळी चार दुचाकी जळत असल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबतची सूचना जवळील अरोरा मशिनरीच्या मालकांना भ्रमणध्वनीवर देऊन त्यांना बोलावून घेतले. तसेच आपल्या हॉटेलच्या इतर सहकाऱ्यांना बोलावून जवळील गुजराती शाळेतील नळ व हॉटेल येथील साहित्यांच्या सहाय्याने ही आग विझविण्यात आली. या जाळपोळ प्रकरणात पॅसिफिक हॉटेल येथील कामगार नितीन गौतम, जितेंद्र जांभूळकर, मुकेश भावे, जितेंद्र वैद्य या चार कामगारांच्या दुचाकी व सूर्यवंशी इंश्योरेन्ससमोर उभी असलेली दुचाकी जळून खाक झाली. यात प्रत्येकी ९० हजार रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणातील चार दुचाकी मालकांसह अरोरा मशिनरीच्या मालकांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दुचाकी जाळपोळीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, पोलिस तपास करीत आहेत.