अटक न करण्यासाठी मागितली लाच

0
32
वाशीम : जनतेच्या रक्षणाची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर आहे. परंतु, पोलीस खात्याला देखील काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांमुळे डाग लागत आहे. तालुक्यातील अनसिंग पोलीस ठाण्याअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या एका प्रकरणात आरोपीला अटक न करता कारवाईत सूट देण्यासाठी पोलीस नाईक व पोलीस पाटील यांनीच लाचेची मागणी केली. या प्रकरणी सापळा रचून पोलीस नाईक व पोलीस पाटील यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस पाटील यांना अटक करण्यात आली असून पोलीस नाईक मात्र फरार आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार पोलीस नाईक विनोद दत्तात्रय चित्तकवार ब.न. ७९३ राहणार पार्डी टकमोर पोलीस ठाणे अनसिंग दूरक्षेत्र उकळी पेन व तुळशीराम काशीराम लोखंडे पोलीस पाटील यांनी तक्रारदार यांचे विरुद्ध पोलीस ठाणे अनसिंग येथे दाखल तक्रारीत अटक होऊ न देणे व मोठी कारवाई न करण्यासाठी फिर्यादीकडे लाचेची मागणी केली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ फेब्रुवारी रोजी पडताळणी करून २ फेब्रुवारी रोजी सापळा रचून पोलीस नाईक विनोद चितकवार यांनी फोनवरून लाच रक्कम स्वीकारण्यास सहमती दर्शवल्याने पोलीस पाटील तुळशीराम लोखंडे यांनी १५ हजार रुपये स्वीकारले. याप्रकरणी दोघांविरुद्ध अनसिंग येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पाटील याला अटक करण्यात आली आहे. तर पोलीस नाईक फरार आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गजानन शेळके, पोलीस निरीक्षक महेश भोसले, नितीन टवलारकर, विनोद मार्कंडे राहुल व्यवहारे, पोलीस नाईक योगेश खोटे, रवी घरत यांनी केली असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.