कुष्ठरोगाविरुद्ध लढा देऊन, कुष्ठरोगाला हद्दपार करू या

0
11

अध्यक्षजिल्हाधिकारी व सीईओचे नागरिकांना पत्र

          गोंदिया,दि.4 : कुष्ठरोगाविषयी जागरूकता व शास्त्रीय माहितीच्या अभावामुळे समाजात कलंक आणि भेदभाव होतो, ज्यामुळे रोगाचा प्रसार आणि उपचाराबद्दल गैरसमज वाढतात. कुष्ठरोगाशी संबंधित कलंक आणि भेदभावाचे निराकरण करण्यासाठी तसेच समाजात जागरूकता वाढविण्यासाठी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती पंधरवडा राबविण्यात येत आहे. या अभियानात जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी, नागरिकांनी व सामाजिक संस्थांनी  सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष जिल्हा परिषद पंकज रहांगडाले, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी पत्राद्वारे केले आहे.

          जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पर्श कुष्ठरोग अभियान यशस्वी करून आपला जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे असे पत्रात नमूद केले आहे. कुष्ठबाधित व्यक्तीच्या बाबतीत कोणीही कोणताही भेदभाव करणार नाही व इतर कोणी असा भेदभाव करीत असतील तर त्यांना असे करण्यापासून परावृत्त करण्याची भूमिका नागरिकांनी घ्यावी. आपण सर्वजण वैयक्तिक व एकत्रितरीत्या कुष्ठबाधितांसोबत कोणताही भेदभाव होणार नाही व ते समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होतील यासाठी अथक प्रयत्न करणार आहोत असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

         केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार जिल्हयामध्ये राष्ट्रिय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम अंतर्गत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमीत्त ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२३ पर्यंत कुष्ठरोग निवारण पंधरवाडा जिल्हयामध्ये राबविण्यात येणार आहे.  या अभियानादरम्यान मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. कुष्ठरुग्णांबाबत भेदभाव पाळला जाणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन अनिल पाटील यांनी शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व तालुका नियंत्रण पथक यांना केले आहे.

          पंधरवाडयात शाळेमध्ये प्रार्थनेनंतर कुष्ठरोगा बाबतच्या प्रतिज्ञाचे वाचन करणे. शाळेतील सुचना फलकावर कुष्ठरोग बाबतचे संदेश लिहावेत. सपना ने द्यावयाचे संदेश नुकड नाटय मार्फत प्रश्नमंजुषा, निबंधस्पर्धा, पथनाटय, व कुष्ठरोगावरील गाणी, कविता वाचन, प्रभातफेरीचे आयोजन कुष्ठरोगावरील म्हणी, घोषवाक्य इ. कार्यक्रम राबविण्यात यावे. स्थानीक आरोग्य कर्मचा-यांमार्फत कुष्ठरोगाविषयी विद्यार्थ्याना माहिती देणे व शंकाचे निरसन करणे. कुष्ठरोग जनजागृती कार्यक्रम-शालेय विद्यार्थी महात्मा गांधीचा (बापु) पेहराव परिधान करुन त्यांच्यामार्फत कुष्ठरोगविषयक जनजागृती तसेच महात्मा गांधीजींचे कुष्ठरोगावरील कार्य व संदेश देण्यात यावे. असे त्यांनी शिक्षणाधिकारी यांना लिहले आहे. “कुष्ठरोगाविरुध्द लढा देऊन, कुष्ठरोगाला इतिहास जमा करुया” हा संदेश विद्यार्थी व नागरिकांना द्यावा असेही त्यांनी सांगितले.