देवरी नजिक स्कॉर्पिओला भीषण अपघात-तीन ठार

0
27

देवरी,दि.७- येथील पंधरा किमी अंतरावर असलेल्या परसोडी येथे राज्यमार्गावरील नाल्यावर काल सोमवारी (दि.६) रात्री ८ वाजेच्या सुमारास स्कॉर्पिओ वाहनाला भीषण अपघात झाला. यामध्ये एका बालकासह दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

मृतांमध्ये लीला अजय ताराम (वय ४), आई शकून अजय ताराम (वय 35) आणि आजोबा गयाराम मडावी  राहणार चिपोटा यांचा समावेश आहे. इतर जखमींमध्ये ताराम कुटुंबीयांचे नातेवाईक असल्याचे समजते. सर्व प्रवाशी हे चिपोटा येथे जात असताना सदर अपघात घडला.

सदर वाहन क्र. एमएच ३५-एम-0824 हे देवरी कडून चिचगडच्या दिशेने जात होते. या घटनेत वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव असलेले वाहन परसोडी नजीकच्या नाल्यात कोसळले. या अपघातामध्ये  एका चार वर्षीय बालिकेसह तिच्या आई आणि आजोबांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतक हे तालुक्यातील चिपोटा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. अपघातामधील इतर जखमींना गोंदिया येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. सदर अपघाताचा तपास ठाणेदार शधर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली चिचगड पोलिस करीत आहेत.