थेट स्टेडियम मैदानातून माहिती देताना चार बुकी गजाआड

0
19

नागपूर-नागपुरातील जामठा स्थित विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू असलेल्या भारतविरुद्ध आस्ट्रेलियाच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर चक्क मैदानात बसूनच रिअल टाईम माहिती देणार्‍या चौघांना गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. रिअल टाईम माहिती देताना थेट स्टेडियममधूनच अटक करण्याची नागपुरातील ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे. ही कारवाई कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी १0.३0 च्या सुमारास करण्यात आली.
प्रतीक प्रकाश मंत्री (वय ३0) रा. विनोबानगर तुमसर जि. भंडारा, दर्शन अशोक गोहील (वय ३९) रा. मजेठियानगर एसव्ही रोड मिलाप पीव्हीआरजवळ कांदेवली मुंबई, जयकिशन विष्णू क्रिष्णानी (वय २९) रा. जुना बगडगंज गरोबा मैदान व सुनील सत्रामदास आमेसर (वय ३६) रा. जीवनधारा अपार्टमेंट सीए रोड आंबेडकर चौक लकडगंज अशी आरोपींची नावे आहेत. जामठा स्टेडियमवर बॉर्डर-गावस्कर चषक क्रिकेट कसोटी सामना खेळण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार या सामन्यावर क्रिकेट सट्टेबाजांची जोरदार फिल्डिंग सुरू होती. त्यामुळे दोन दिवसांपूर्वीच पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेला अलर्ट मोडवर ठेवले होते. नागपुरातील बुकींकडून क्रिकेट सामन्यावर कोट्यवधींची सट्टेबाजी होत असते. त्यामुळे कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्याच दिवशी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त एम. सुदर्शन आणि पोलिस निरीक्षक किशोर पर्वते यांचे पथक तैनात होते.
स्टेडियमच्या आतमध्ये इतरत्र असलेल्या काही सेकंदाच्या फरकाने बुकींना माहिती देण्यात येऊन क्रिकेटवर सट्टा लावण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली. त्यासाठी पोलिसांनी साध्या वेशातील पोलिसांची पाच पथके तयार केली. बुकींचा शोध घेण्यासाठी या पथकांनी सुरुवात केली. पोलिसांना या चारही बुकींची पूर्ण माहिती मिळालेली असल्याचे सांगितले जाते. क्रिकेट बुकींसाठी रिअल टाईम माहिती महत्त्वाची ठरत असल्याने बुक्की मैदानात आपले काही पंटर ठेवत असतात. त्या आधारावर लगेच सट्टय़ाचे भाव बदलतात आणि कोट्यवधींची खायवडी केली जाते. मात्र, मैदानातील हे बुक्की सहसा पोलिसांच्या हाती लागत नाहीत. त्यामुळे या कारवाईचे महत्त्व मोठे आहे.