प्रकट दिनाच्या धामधुमीत शेगावात पिस्तूलसह काडतुस जप्त

0
20

बुलढाणा,दि.13ः- शेगावात प्रकट दिनानिमित्त श्रींचे मंदिर दर्शनासाठी रात्रभर सुरू असल्याने तोबा गर्दी उसळली आहे. अशातच, रविवारी रात्री शेगाव-वरवट मार्गावरील बुरुंगले विद्यालयाजवळ तैनात पोलिसांनी एक मोटारसायकल अडविली. वाहन चालकासह तिघांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ एक पिस्तूल, ४ जीवंत काडतुसे, ३ मोबाईल आढळून आले. पोलिसांनी पिस्तूल आणि दुचाकी जप्त केली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. प्राथमिक तपासात आरोपी हे मध्यप्रदेशच्या सिमेवरील संग्रामपूर तालुक्यातील पातूरडा ( जि.बुलढाणा) येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. शेख अकबर शेख हरुन ( २१), जीवन तेजराव गाडे (१८) अशी दोघा आरोपींची नावे असून एक आरोपी अल्पवयीन आहे. आरोपींनी हे पिस्तूल आणि काडतूस शेगावात विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली, अशी माहिती सूत्रांनी दिली. यामुळे यंत्रणांनी तूर्तास सुटकेचा श्वास घेतला असला तरी प्रकट दिनाचा मुहूर्त लक्षात घेता यंत्रणा जास्तच दक्ष झाल्या आहेत.