जळीत कांडातील आरोपीला न्यायालयीन कोठडी

0
24
आरोपीला फाशीच्या शिक्षेकरीता सुर्याटोलावासियांचा न्यायालय परिसरात आक्रोश मोर्चा

गोंदिया- शहराजवळील सूर्याटोला येथे जावयाने आपल्या सासऱ्यासह पत्नी व मुलाला पेट्रोल घालून जाळल्याची घटना बुधवारी (दि. १५) पहाटे १ वाजताच्या सुमारास घडली होती. या प्रकरणात अटकेनंतर पीसीआरमध्ये असलेल्या आरोपी किशोर श्रीराम शेंडे(४०,रा.भिवापूर,ता.तिरोडा) याला आज (दि.20)जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता,आरोपीच्या विरोधात सुर्याटोला येथील शेकडो महिला पुरुषांनी एकत्र येत आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे याकरीता न्यायालय परिसरात एकत्र आले होते.लगेच गोंदिया शहर पोलिसांनी न्यायालयात पोलिसांना पाचारण करीत नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.दरम्यान न्यायालयाने आरोपी किशोर शेंडे यास पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडी सुनावली. या घटनेतील जखमी आरती शेंडे ही ४० ते ५० टक्के भाजल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.ती बयाण देण्याच्या स्थितीत नसल्याचे डाॅक्टरांचे म्हणने आहे.

चारित्र्याच्या संशयाने केला घात
आरोपी किशोर व आरती यांचे सन २०१३ ला लग्न झाले. तेव्हापासून तो आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर
संशय घेत होता. यातून त्याने तिला अनेकदा मारहाण केली. या मारहाणीला त्रस्त होऊन ती महिनाभरापूर्वी मुलांना घेऊन माहेरी आली होती. किशोर शेंडे मारहाण करीत असल्याने त्याच्या विरोधात आरतीने तिरोडा पोलिस ठाण्यात मारहाण
केल्याच्या तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे तिरोडा पोलिसात या आरोपीवर अदखलपात्र गुन्हे
दाखल करण्यात आले होते.

आरोपी हा आपल्या कुटुंबाला व सासऱ्याच्या कुटुंबाला संपवायला निघाला होता.परंतु त्याची मुलगी स्वरांजली ही घटनेच्या दिवशी आपल्या आत्याकडे झोपायला गेली होती.त्यामुळे या घटनेपासून वाचली,तर आरोपीची सासू ममता मेश्राम या आपल्या नवीन घराचे बांधकाम सुरू असल्याने त्या नवीन घराकडे असल्यामुळे त्या सुद्धा बचावल्या.घटनेच्या रात्री आरोपीचा साळा हा मजुरीसाठी बालाघाट येथे गेला होता.या प्रकरणात आरोपींने बायको माहेरी आल्याचा राग आल्याने आपणच पेट्रोल टाकून जाळल्याची कबुली दिल्यानंतर त्याला भिवापूर येथून अटक करण्यात आली होती.