पैसे दुप्पट करण्याच्या नावावर ६.५९ लाखाने लुटले

0
19

गोंदिया : वेळोवेळी फेसबुक, व्हाॅट्सॲपद्वारे विश्वास संपादन करून चार दिवसांत पैसे दुप्पट करून देण्याचे खोटे आमिष दाखवून ६ लाख ५९ हजाराने फसवणूक करणाऱ्या एकावर गोंदिया शहर पोलिस ठाण्यात ८ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सिव्हिल लाईन, हनुमान चौक येथील जावेद अब्दुल रफिक (३०) हे १० जानेवारी रोजी फेसबुक पाहत असताना दीक्षिका ईका नावाच्या व्यक्तीला त्यांनी फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती. तिने ती रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली. तिला काही दिवसाने मोबाइल नंबर दिला. त्या मेसेजवर संवाद करताना चार दिवसांत पैसे दुप्पट करून देत असल्याचे सांगण्यात आले. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी ६ लाख ५९ हजार रुपये २६ जानेवारीला पाठविले. २९ जानेवारी रोजी त्यांनी पैशासंदर्भात विचारले असता त्यांनी बँकेची प्रोसेस करायला सांगितली. पेटीएमवर २३०० रुपये बँकेचा खर्चही त्यांनी पाठविल्यामुळे जावेद यांना विश्वास बसला. वेगवेगळ्या तारखेला त्यांनी ६ लाख ५९ हजार रुपये पाठविले. परिणामी, त्यांची फसवणूक करण्यात आली. या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ४२०, सहकलम- ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी करीत आहेत.