दोन हजारांची लाच घेताना कनिष्ठ अभियंत्याला अटक

0
132

गोंदिया, ता. १४ ः गोठा बांधकामाचे बिल मंजुरीसाठी पाठविण्याकरिता तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना गोरेगाव पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंत्याला (कंत्राटी) अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (ता. १४) हिरडामाली येथील मिथून पान सेंटर येथे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली. जगदीश सदाशिव रहांगडाले (वय ३४,रा. भुताईटोला,ता. गोरेगाव) असे आरोपीचे नाव आहे.
यातील तक्रारदाराच्या वडिलाच्या नावाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत २०२१-२२ मध्ये गोठा बांधकामाकरिता ७७ हजार रुपये अनुदान मंजूर झाले होते.त्यानुसार तक्रारदाराने फेब्रुवारी २०२३ मध्ये गोठ्याचे बांधकाम पूर्ण केले. दरम्यान, बांधकाम व बांधकामाच्या बिलाची तपासणी करून बरोबर असल्याचा शेरा नमूद करून बिल मंजुरीसाठी पाठविण्याकरिता कनिष्ठ अभियंता जगदीश रहांगडाले याने तक्रारदाराकडून यापूर्वी पाच हजार रुपये घेतले. आणखी तीन हजार रुपयांची मागणी केली. परंतु, तक्रारदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. विभागाच्या पथकाने सोमवारी (ता. १३) पडताळणी केली. यावेळी आरोपी जगदीश रहांगडाले याने तक्रारदाराला तडजोडीअंती दोन हजार रुपये व कोंबड्याचे जेवण मागितल्याच स्पष्ट झाले. दरम्यान, पथकाने मंगळवारी हिरडामाली येथील मिथून पान सेंटर येथे तक्रारदाराकडून कनिष्ठ अभियंता रहांगडाले याला दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.