कोट्यवधींच्या मुद्देमालासह १६ रेती तस्कर पोलिसांच्या ताब्यात

0
24
file photo

चंद्रपूर- खनिकर्म विभाग, पर्यावरण विभाग, महसूल विभाग त्याचप्रमाणे पोलिस विभागाला वेठीला धरून अथवा अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करून मोठय़ा प्रमाणात सुरू असलेली अवैध रेती तस्करी करणारे तब्बल पाच जिल्ह्यातील १६ तस्करांचे सिंडिकेट स्थानिक गुन्हे शाखेने उद्ध्वस्त करून ३ कोटी ३0 लक्ष ४0 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले आहे.
सविस्तर वृत्त असे की, गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात असलेल्या खोब्रागडी नदीच्या पात्रात असलेल्या डोंगरतमाशी रेतीघाटावर बर्‍याच महिन्यांपासून रात्रीच्या वेळी खोब्रागडी पोकलेन, जेसीबीचे साहाय्याने प्रचंड प्रमाणात अवैधरित्या वाळूचा उपसा सुरू असताना गडचिरोली पोलिस विभागाच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून १६ वाळू तस्करांसह ३ कोटी ३0 लक्ष ४0 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून अलीकडच्या काळातील पोलिस विभागाची रेती तस्करांवरील ही पहिलीच मोठी कारवाई आहे. गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखेला सदर तस्करीची गोपनिय आणि खात्रीशीर माहिती प्राप्त झाली होती. स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांचे नेतृत्वाखाली डोंगरतमाशी रेतीघाटावर १४ मार्च रोजी रात्री १0 च्या दरम्यान नियोजनबद्ध सापळा रचून छापा टाकला असता नदीपात्रातून वाळू तस्कर मोठय़ा प्रमाणात पोकलेन, जेसीबीचे साहाय्याने वाळूची अवैधरित्या उपसा करीत असल्याचे आढळून आले. सदर चोरी केलेल्या रेती रात्रीच्या अंधारातच परजिल्ह्यात विक्रीसाठी पाठविण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले.
रेतीघाटावर पंचासमक्ष पंचनामा केला असता सदर ठिकाणी खोब्रागडी नदीपात्रातून उपसा करण्याकरिता वापरण्यात येणारे पोकलेन मशीन व रेती वाहतुकीकरिता वापरात येणारे १२ मोठे ट्रक व टिप्पर तसेच सदर अवैध रेती वाहतुकीकरिता आरोपींचे गस्त घालण्याकरिता असलेली कार असा एकूण ३ कोटी ३0 लाख ४0 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी घटनास्थळी उपस्थित तस्करीत सहभागी असलेले निखील शंकरराव भुरे (३५) चाठोडा, ता. जिल्हा नागपूर, राहुल बाजीराव घोरमोडे (३0) बेटाळा, पो. किन्ही, ता. ब्रह्मपूरी, जिल्हा चंद्रपूर, सोनल नानाजी उईके डोंगररतमाशी, ता. आरमोरी, जिल्हा गडचिरोली, धनंजय यशवंत मडावी डोंगरतमाशी ता.आरमोरी जिल्हा गडचिरोली, यशवंत महादेव मडकाम कुरंडीमाल ता. आरमोरी जिल्हा गडचिरोली, नितेश उमेश मालोदे (३0) निलज ता. पवनी, जिल्हा भंडारा, अफसर अनवर शेख (२६) ता. भिवापूर, जिल्हा नागपूर, अब्दुल राजीक मो. इस्माईल (५४) अमरावती, अत्ताउल्ला खान रियाज उल्ला खॉन, (३0) लालखडी अमरावती, नरेश तुकाराम ढोक (३४) भिवापूर जिल्हा नागपूर, नासीर नाजीम शेख, (१९) बिडगाव ताजनगर ता. कामठी जिल्हा नागपूर, संतोष ज्ञानेश्‍वर पवार (२८) तळेगाव ठाकूर ता. तिवसा जिल्हा अमरावती, शेख वसीम शेख जलील (२८) मंगरुळ दस्तगिर ता. धामनगाव जिल्हा अमरावती, निखील गोपाल सहारे (२३) विरली ता. लाखंदूर जि. भंडारा, जावेद जमीर खान (२८) ओलंग जिल्हा लात्तेहार (झारखंड), शाम मनसाराम चौधरी वय (३५) कोर्धा ता. नागभिड जिल्हा चंद्रपूर अशा १६ इसमांना ताब्यात घेवून आरमोरी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आणि कलम ३७९, ३४, २0१ भा. दं. वि. अन्वये गुन्हा नोंद केला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. सदर कारवाई पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात पो. उप निरीक्षक दीपक कुंभारे, राहुल आव्हाड, पुरुषोत्तम बाडगुरे, हवालदार नरेश सहारे, हेमंत गेडाम, पोलिस नाईक सतिश कत्तीवार, दिपक लेनगुरे, शुक्रचारी गवई, राकेश सोनटक्के, अंमलदार जगदाळे, सुनील पुढावार, मंगेश राऊत, श्रीकांत बोईना आदींनी केली.