साडेचार हजार वाहनचालकांची ३0 कोटींनी फसवणूक

0
33

भंडारा-कमी पैशात वाहन खरेदीचे आमिष दाखवून वाहनचालकांची फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला आहे. यात भंडारासह नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील साडेचार हजार वाहनचालकांचा समावेश असून फसवणुकीची रक्कम सुमारे ३0 कोटींच्या घरात असल्याची माहिती आहे. याप्रकरणी भंडारा पोलिसात गुन्हा नोंदवून एकाला अटक करण्यात आली आहे. परंतु, या प्रकरणात संबंधित शोरुम चालक आणि फायनान्स कंपनीतील दोषींवरही कारवाई करण्यात यावी, अशी तक्र ार पिडीत वाहनचालकांनी भंडारा पोलिसात केली आहे.
याबाबत फसवणूक झालेले राहूल मारबते यांनी सांगितले की, दुचाकी खरेदीसाठी भंडारा येथील शोरुममध्ये गेले असता शोरुममधील काही कर्मचारी त्या शोरुमधील केबिनमध्ये बसलेल्या एम फायनान्स कंपनीच्या व्यक्तीकडे लोकांना पाठवायचे. एम फायनान्समधून दुचाकी खरेदी केल्यास कमी किमतीमध्ये दुचाकी मिळेल, असेही त्या कर्मचार्‍यांकडून सांगण्यात येत होते. या आमिषाला बळी पडलेल्यांनी एम फायनान्स कंपनीतून फायनान्सवर दुचाकी खरेदी केल्या. दुचाकीची किंमत ९६ हजार रुपये होती. तेव्हा एम फायनान्सला ६२ हजार रुपये दिले. तर २ हजार रुपये प्रमाणे सहा महिन्याची किस्त पाडण्यात आली. आपल्याला ९६ हजारांची दुचाकी ७४ हजारांना पडल्याचा त्यांना आनंद झाला. परंतु, एम फायनान्सने दुसर्‍याच कंपनीकडून त्यांच्या दुचाकीचे फायनान्स करुन घेतले होते. यामध्ये टाटा, श्रीराम सिटी, बेरार आदी फायनान्स कंपन्यांचा समावेश आहे. त्यामुळे त्या कंपनीकडून पैशासाठी त्यांना तगादा होऊ लागला. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे उघड झाले. असाच प्रकार भंडारा येथील आशिष गोस्वामी, अरुण अतकरी, ईश्‍वर बोधनकर यांच्यासह भंडारातील हजारो लोकांसोबत घडला आहे. याशिवाय नागपूर आणि गोंदियातील अनेक लोक त्यांच्या जाळ्यात अडकले आहेत. साधारणत: तिनही जिल्ह्यातील साडेचार हजार लोकांसोबत फसवणूकीचा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर फसवणूक झालेल्यांनी भंडारा पोलिसात तक्र ार केली. तक्र ारीवरुन पोलिसांनी एम फायनान्सचा संचालक कासिब खान याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली. परंतु, या प्रकरणात ज्या शोरुममध्ये बसून हा संपूर्ण गोरखधंदा सुरू होता त्या शोरुमचे मालक, कर्मचारी, फायनान्स करुन देणार्‍या कंपनीचे अधिकारी, कर्मचारी यांनाही आरोपी करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

फायनान्स कंपनी, शोरुम मालकांना नोटीस
कोट्यवधी रुपयांचे हे फसवणूक प्रकरण भंडारा पोलिसापर्यंत गेल्यानंतर भंडारा पोलिसांनी संबंधित फायनान्स कंपनी, शोरुम मालकांना नोटीस पाठवून पोलिस ठाण्यात बोलविले आहे. त्यांनी आपले म्हणणे मांडल्यानंतर पोलिसांची तपासाची दिशा ठरणार आहे.