एटापल्ली-कसनसूर मार्गावर आढळले नक्षली बॅनर

0
27

गडचिरोली-एटापल्ली तालुक्यातील एटापल्ली-कसनसूर मार्गावरील मवेली गावाजवळील पुलावर गुरुवारी सकाळी नक्षल्यांचे बॅनर आढळून आले आहे. या बॅनरबाजीतून नक्षल्यांनी रस्ता निर्माण कार्य करणार्‍या कंत्राटदारांना बांधकाम बंद करण्याचा इशारा दिला आहे. या घटनेमुळे तालुक्यातील अतिदुर्गम भागात विकास कामे करणार्‍या कंत्राटदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नक्षल्यांद्वारे फेब्रुवारी ते मे या कालावधी टीसीओसी सप्ताह साजरा केला जात आहे. या कालावधीत नक्षल्यांद्वारे अतिदुर्गम क्षेत्रात हिंसक कारवाचा घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. यादरम्यान एटापल्ली तालुक्यातील एटापल्ली-कसनसूर मार्गावरील मवेली गावाजवळील पुलावर नक्षल्यांनी बांधलेले बॅनर आढळून आले. या बॅनरमध्ये नक्षल्यांनी कसनसूरपयर्ंतचे रस्ता काम तत्काळ बंद करण्यात यावे, अन्यथा पुढील परिणामाला सामोर जा, असा धमकीवजा इशारा संबंधित कंत्राटदारांना उद्देशून दिला आहे. नक्षल्यांच्या या बॅनरबाजीमुळे अतिदुर्गम भागात विविध विकास कामे करणार्‍या कंत्राटदारासह नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच अहेरी उपविभागांतर्गत येत असलेल्या भामरागड व एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागात नक्षल्यांद्वारे नवनिर्मित बांधकामावरील वाहनांची जाळपोळ केली होती. यामुळे जिल्ह्याच्या दक्षिण भागात नक्षली अधिक सक्रिय झाल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.