भंडारा : सध्या क्रिकेट सट्टेबाजीला उधाण आले असून या सट्टेबाजांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे. मागील दोन दिवसांत शहरात दोन ठिकाणी धाडी टाकून मुख्य बुकीसह पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खात रोड येथील उज्ज्वल नगर तसेच गणेशपूर येथे सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सट्टा अड्ड्यावर भंडारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दि. २५ आणि २६ मे रोजी धाडी टाकल्या. त्यात २ लाखांच्या मुद्देमालासह पाचजणांना आतापर्यंत अटक करण्यात आली.
सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रमियर लिग प्ले ऑफ एलिमीनेटर मॅच मुंबई इंडियंन्स विरुद्ध गुजरात टायटन या संघाच्या क्रिकेट सामन्यावर गणेशपूर येथे लोकांकडून पैसे घेऊन सट्टा लावण्यात येत असल्याची गोपनीय माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक तयार करण्यात आले. दि. २५ मे रोजी खात रोड परिसरातील उज्ज्वल नगरमध्ये सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर धाड टाकली. यात आरोपी अश्विन व अरविंद क्षीरसागर यांच्याकडून १ लाख ६४ हजार ४८० रुपये, दोन दुचाकी, ८ मोबाईल जप्त करण्यात आले. दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर अमित उदापूरे या मुख्य आरोपीचा शोध सुरू होता. २५ मे रोजी त्यालाही अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी २६ मे रोजी गणेशपूर येथे सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सट्टा अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत प्रवीण रमेश बावनकर (३०) व मनोज नवखरे (३५) दोन्ही रा. गणेशपूर यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून २ मोबाईलसह ३८,७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई एलसीबीचे निरीक्षक नितीन चिंचोळकर, सहायक पोलीस निरीक्षक कुडमाते, किशोर, हवालदार मिश्रा, प्रदीप धरणे, आशिष तिवडे यांनी केली.