भंडारा : भंडारा अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे वसुली अधिकारी बन्सीधर कारेमोरे (५८) यांनी निवृत्तीला दोन दिवस असतानाच वैनगंगा नदीत उडी मारून आत्महत्या केली. कारेमोरे यांचा मृतदेह तब्बल ३० तासांनंतर, बुधवारी सायंकाळी ५ वाजता गणेशपूर स्मशानभूमीजवळ नदीपात्रात आढळून आला. या घटनेमुळे बँक वर्तुळासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.गेल्या काही महिन्यांपासून भंडारा अर्बन को ऑपरेटिव्ह बँक कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. अशातच, बँकेतील एका वसुली अधिकाऱ्याच्या आत्महत्येमुळे बँक व्यवस्थापनाबाबत चर्चांना पेव फुटले आहे. कारेमोरे यांना दीड महिन्यांपूर्वी बँक व्यवस्थापनाने निलंबित केले असल्याची माहिती आहे. दोन महिन्यांपासून ते वैद्यकीय रजेवर होते. मंगळवारी दुपारपासून ते घरातून बेपत्ता होते. कारधा येथील वैनगंगा नदीच्या पुलावर त्यांचे जोडे आणि काही सामान सापडले. मात्र, त्यांना नदीत उडी घेताना कोणी पाहिले नाही. कारेमोरे आज, ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होणार होते. निवृत्तीला अवघे दोन दिवस उरले असतानाच त्यांनी आत्महत्या का केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.