कुरखेडा -तालुक्यातील ग्यारापत्ती येथील घनदाट जंगलात रविवारी (ता. ३) राज्य राखीव पोलिस दल व ग्यारापत्ती पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान तीन जुन्या बनावटीच्या भरमार बंदुका आढळून आल्या. त्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तीन बंदुका जप्त केल्या आहेत. मात्र या बंदुका कुणाच्या हे अद्याप कळू शकले नाही.
जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात एका झोपडीत आढळलेल्या तीन जुन्या पद्धतीच्या भरमार बंदुका नेमक्या कोणाच्या, याचा शोध अद्याप लागलेला नाही. त्या नक्षलवाद्यांच्या असल्याचा कयास बांधल्या जात असला, तरी नक्षलवादी असे बंदुका सोडून जातात का? अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.
वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी अनेक लोकांकडे अशा पद्धतीच्या बंदुका असल्याची माहिती आहे. अलीकडे आवाहनानुसार बऱ्याच लोकांनी त्या बंदुका पोलिसांकडे जमा केल्या आहेत. मात्र अजूनही अनेक लोकांकडे बंदुका असण्याची शक्यता नाकारता येत नाही. रविवारी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान आणि जिल्हा पोलिस दलाच्या नक्षलविरोधी पथकाच्या संयुक्त गस्तीदरम्यान या बंदुका दिसल्या. या बंदुका नक्षलवाद्यांच्या असतील, असे वाटत नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तरीही ज्या झोडपीत बंदुका सापडल्या तेथून चौकशीला सुरुवात करण्यात आली असल्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.