गोंदिया, 14सप्टेंबर
संदिग्ध स्थितीत असलेल्या वाहनातून पाच कॉमन क्रेन (सारस प्रजातीचे) विदेशी पक्ष्यांची तस्करी करणार्या पाच आरोपींना महामार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई 12 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर बाम्हणी गाव शिवारात महामार्ग पोलिस केंद्र डोंगरगावच्या पथकाने गस्तीदरम्यान केली.
अझरुद्दीन गुलाब मोयुद्दीन मौलवी (25), समीर साकीर मंसूरी (29), मुसा शेख (24), शहजाद शेख सकील (29) पठाण हुसेन गुलाम साबीर (19) रा. भेंडीबाजार सुरत (गुजरात) अशी आरोपींची नावे आहेत. पाचही आरोपींना दोन चारचाकी वाहनांसह ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
महामार्ग पोलीस केंद्र डोंगरगावचे पोलिस पथक मंगळवारी रात्रीच्या दरम्यान गस्तीवर असताना महामार्ग क्रमांक 53 वर बाम्हणी गाव शिवारात संशयितरित्या वाहन क्रमांक जीजे 05, जेबी 7737 व जीजे 05, आरई 7430 दिसले. वाहनाजवळ जाऊन पोलिस पथकाने चौकशी केली असता वाहनातील इस्मानी मुंबईला जात असल्याचे सांगितले. त्यानंतर वाहनाची अधिक बारकाईने पाहणी केली असता वाहन क्रमांक डीजे 05, जेबी 77 37 च्या मागील बाजूस दुर्मिळ प्रजातीचे पाच पक्षी दिसले. पक्षांचे नाव विचारले असता ते कॉमन क्रेन (सारस प्रजातीचे) असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान आरोपी समीर मंसूरी, हजरुद्दीन मौलवी, मुसा शेख, सहजाद शेख, पठाण हुसेन गुलाम साबीर या पाचही जणांना वाहनासह ताब्यात घेतले. पक्षी व आरोपींना वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. हे पक्षी कोलकाता येथून मुंबई येथे घेऊन जात असल्याचे आरोपींनी सांगितले. याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी वाढाई, गढवे, स्वयंसेवी संस्थेचे संचालक सावन बहेकर यांनी पुढील कारवाईकरिता आरोपींची अधिक विचारपूस करून 13 रोजी दुपारी न्यायालयात सादर करून त्यांची वन कोठडी घेतली. दरम्यान पक्षांना नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालयात पाठविण्यात आले आहे. ही कारवाई डोंगरगाव महामार्ग पोलिस केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक दिनेश लिल्हारे, जोकार, पोलिस नायक बनोठे, पोलिस शिपाई अली, चचाणे, सहायक फौजदार भुरे, पोलिस नायक नेरकर यांच्या चमुने केली.