आश्रमशाळेत शिक्षकाडून सहा आदिवासी विद्यार्थिनींची छेड

0
12

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम हालेवारा आश्रमशाळेत सहा आदिवासी विद्यार्थिनींची शिक्षकाने छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तक्रार प्राप्त हाेताच पोलिसांनी गुन्हा नोंदवून नराधम शिक्षकाच्या मुसक्या आवळल्या. या घटनेने दुर्गम भागातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.प्रदीप तावडे असे शिक्षकाचे नाव आहे. तो चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. हालेवारा येथे शासकीय आश्रमशाळा असून तेथे आदिवासी मुले-मुली निवासी शिक्षण घेतात. दरम्यान, १२ सप्टेंबरला प्रदीप तावडे सहावीच्या वर्गातील मुलींना अध्यापन करत होता.

यावेळी त्याने मुलींच्या जवळ जाऊन त्यांच्याशी आक्षेपार्ह वर्तन केले. सहा मुलींच्या बाबतीत हा किळसवाणा प्रकार घडला. दरम्यान, मुलींनी मोठ्या धाडसाने याबाबत पालकांना कळविल्यानंतर कसनसूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. त्यानुसार बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, विनयभंग या कलमान्वये प्रदीप तावडेविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर त्यास पोलिसांनी जेरबंद केले. दरम्यान, आज, बुधवारी आरोपी प्रदीप तावडे यास अहेरी न्यायालयात हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.