3 आरोपींवर गुन्हे दाखल
गोंदिया : तिरोडा पोलिसांनी संत रविदास वार्डात धाड घालून तब्बल 3 लाख 69 हजार 650 रुपये किंमतीचा सडवा मोहपास, हातभट्टीची दारू व इतर साहित्य जप्त केला. ही कारवाई आज रविवार, 17 सप्टेंबर 2023 रोजी करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार पुंडे यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये सुरज प्रकाश बरीयेकर (वय 35), माया प्रकाश बरीयेकर (वय 60) व प्रिया सुरज बरीयेकर (वय ३३) तिन्ही रा. संत रविदास वार्ड तिरोडा यांचा समावेश आहे.
सविस्तर असे की, पोलीस निरीक्षक देविदास कठाडे, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार पुंडे, पोलीस उपनिरीक्षक दलालवाड. परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक बरड, पोलीस शिपाई दमाहे, पोलीस शिपाई शेंडे, पोलीस शिपाई माहुले, महाराष्ट्र पोलीस शिपाई बोपचे हे तिरोडा बीट परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, संत रविदास वार्डात एक पुरुष आपल्या घरी अवैधरित्या मोह्फुलांची चालू भट्टी लावून हातभट्टीची दारू गाळत आहे. या खबरेवरून दोन पंचांसह पोलिसांनी संत रविदास वार्डातील सुरज प्रकाश बरीयेकर याच्या घरी धाड मारली. तेथे एक इसम आढळला. त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव सुरज प्रकाश बरीयेकर असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी पंचासमक्ष त्याच्या घराची पाहणी केली. दरम्यान आरोपीच्या घराच्या मागील खोलीत एका चुलीवर लोखंडी ड्रम मांडून मोह्फुलांची दारू गाळताना तिन्ही आरोपी एकत्रितरित्या मिळून आले. तेथे एकूण 3 लाख 69 हजार 650 रुपयांचा माल अवैधरित्या मिळून आला. सदर माल पंचांसमक्ष कायदेशीररित्या ताब्यात घेण्यात आला. पंचांनी हा माल सडवा मोहपास असल्याचे जाहीर केले. त्यानंतर एका काचेच्या शिशीत सडवा मोहपास व दुसऱ्या शिशीत हातभट्टीची दारू सिलबंद करून त्यावर पंच, आरोपी व स्वतःच्या सहीचे कागदी मेमो तयार करून बांधून सीए संपल करिता लाखमोहरेनिशी मोक्यावर सिलबंद करून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर तिरोडा नगर परिषदेचे ट्रक्टर बोलावून, उर्वरित सडवा मोहापास, हातभट्टीची दारू, जळावू काड्या, लोखंडी ड्रम, नेवार पट्टी, प्लास्टिक पाईप आदी सर्व माल त्यामध्ये भरून काशिघाट नाल्यावर नेवून नष्ट करण्यात आला. आरोपींना पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देवून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (ब, क, ड, ई, फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे, पोलीस निरीक्षक देविदास कठाडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.