सुनेचा कुऱ्हाडीने खून तर वहिणीचे कान छाटले

0
7

गोंदिया : घराशेजारी घर असल्याने अधून-मधून क्षुल्लक-क्षुल्लक कारणातून होणाऱ्या वादावर कायमस्वरूपी विराम आणायचा म्हणून पुतन सुनेवर कुर्हाडीने घाव घालून खून केला. तर वहिणीचे कुऱ्हाडीने कान छाटल्याची घटना २४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता गोंदिया तालुक्याच्या देवरी धापेवाडा येथे घडली. सुनिता दिनेश ठाकरे (३५) रा. देवरी असे मृत महिलेचे नाव आहे. तर रिमनबाई प्रेमलाल ठाकरे (६०) रा. देवरी असे गंभीर जखमी असलेल्या वहीणीचे नाव आहे.
गोंदिया तालुक्याच्या देवरी (धापेवाडा) येथील आरोपी प्रितमलाल सहेसराम ठाकरे (५५) हा शुल्लक कारणावरून भावाघरच्या मंडळींसोबत वाद करायचा. या वादात तो ठार मारीन अन् जेल भोगून येईल असे नेहमी म्हणायचा. २४ सप्टेंबर रोजी मृतक सुनिता ठाकरे व तिची सासू रिमनबाई ठाकरे ह्या दोघ्याही घरीच होत्या. तिचे पती झिटाबोडी येथे गेले होते. तर सासरे हे शेतात गवत आणायला गेले होते. घरी असलेल्या सासू- सुनेसोबत आरोपी प्रितमलाल ठाकरे (५५) याने वाद सुरू केला. तणस आणि गवतावरून उत्पन्न झालेला वाद खुनावर येऊन थांबला. गवतावरून झालेल्या वादात आरोपी प्रितमलाल याने कुऱ्हाड आणून सुनिताच्या गळ्यावर, डोक्यावर सपासप वार केला. यात रक्ताच्या थारोड्यात पडलेल्या सुनिताचा क्षणार्धात मृत्यू झाला. तो इतक्यातच थांबला नाही. त्याने आपल्या हातातील कुऱ्हाड रिमनबाई यांच्यावर उगारली. यात त्यांचा एक कान छाटल्या गेला. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मृत पावलेल्या सुनिता ठाकरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात आला.