गोंदिया ः गोरेगाव पोलिसांनी दोन दुचाकी चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. प्रशांत राजकुमार सयाम (वय १९, रा. बिरडीटोला, ता. सडक अर्जुनी) व साहिल उमेंद्र बिसेन (वय १९, रा. बाह्मणी, ता. गोरेगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
यातील आरोपी प्रशांत सयाम हा चोरीची दुचाकी चुलोद येथे विकणार असल्याची गुप्त माहिती गोरेगावच्या पोलिस पथकाला मिळाली. या माहितीवरून पथकाने तिथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ चोरीस गेलेली एमएच ३५/ एक्स ५२४० क्रमांकाची एचएफ डिलक्स ही दुचाकी मिळून आली. तसेच त्याच्याकडे अधिक तपास केला असता पुन्हा एफ झेड फाईव्ह (विना क्रमांकाची) व हिरो स्प्लेंडर प्रो दुचाकी (विना क्रमांकाची) मिळून आली. दरम्यान, पोलिसांनी त्याची कसून चाैकशी केली असता आरोपीने गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या साहिल बिसेन याचे नाव सांगितले. त्यावरून पोलिसांनी साहिलचे बाह्मणी हे गाव गाठून शोध घेतला असता त्याच्याजवळ एमएच ३५/ यू. २१७४ क्रमांकाची हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी मिळून आली. तसेच सटवा डव्वा येथे विना क्रमांकाची हिरो स्प्लेंडर दुचाकी मिळून आली. अशा एकूण पाच दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक अजय भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गोसावी, सहायक फौजदार राजकुमार पवार, पोलिस हवालदार रमेश पटले, पोलिस हवालदार सुनील वानखेडे, पोलिस शिपाई सुरेश रहांगडाले पोलिस शिपाई कमलेश गराट, शैलेंद्र बोंदरे, तिरंजीव कुमडे, चाचेरे, निकेश राठोड यांनी केली.