बकरा चोर सापडले,दुचाकीसह मुद्देमाल जप्त; रावणवाडी पोलिसांची कारवाई

0
6

गोंदिया ः अॅक्टीव्हा दुचाकीने बकरा चोरून नेणाऱ्या तीन जणांना रावणवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. यातील आरोपींपैकी एक जण विधीसंघर्ष बालक आहे. यश योगेश करोशिया (वय १९, रा. चांदणी चौक, स्टॉपजवळ काटी, ह. मु. डब्लींग कॉलनी, गोंदिया), शक्ती आनंद कुवर (वय १९, रा. डब्लींग ग्राउंड गौतमनगर, गोंदिया) व सिव्हील लाइन गोंदिया येथील एक विधीसंघर्ष बालक अशी आरोपींची नावे आहेत. या तिन्ही आरोपींना पोलिसांनी ३० सप्टेंबर रोजी रात्री ११ च्या सुमारास शिरपूर येथून ताब्यात घेतले.
याबाबत सविस्तर असे की, मंगल बाबुलाल मस्करे (रा. मुरपार, ता. गोंदिया) हे ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास गावाशेजारी आपल्या मालकीचा बोकड व इतर शेळ्या चारत होते. यावेळी एमएच ३५/ ए. एस. ७९०२ क्रमांकाच्या अॅक्टीव्हा दुचाकीने आलेल्या तीन जणांनी रावणवाडी ते बालाघाट रस्त्यावरून बकरा चोरून नेला. याबाबतची तक्रार त्यांनी रावणवाडी पोलिसांत केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, आरोपींचा शोध घेत असताना तीन जण दुचाकीने एक बकरा विक्री करण्याच्या इराद्याने फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी मोठ्या शिताफिने अॅक्टीव्हा दुचाकी व एक बकरा अशा एकूण ५६ हजार रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी यश करोशिया, शक्ती कुवर तसेच एका विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले. ही कारवाई रावणवाडीचे ठाणेदार पुरुषोत्तम अहेरकर, पोलिस हवालदार रंजित बघेले, सुबोध बिसेन, पोलिस नायक मलेवार यांनी केली.