एआयएमआयएमच्या शहर अध्यक्षाविरुद्ध खंडणीचा गुन्हा

0
9

चंद्रपूर: एआयएमआयएम पार्टीचे चंद्रपूर शहर अध्यक्ष अजहर शेख यांच्या विरूद्ध शहर पोलीस ठाण्यात १० लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जी.के.आर्टस ट्रेडर्सचे संचालक वसीम अख्तर झीमरी यांचा सुपारी व पान मटेरिअलचा व्यवसाय आहे. ९ ऑक्टोबरच्या संध्याकाळी झीमरी यांच्या गाडीचा चालक हेमंत निलेवार बल्लारपूर येथून परत येत असताना जुनोना चौकात अमर कन्फेशनरी या दुकानात सुपारी देण्यासाठी थांबला असत तिथे अजहर शेख आले. दमदाटी करून गाडीची झडती घेतली. त्यानंतर मालकाला तत्काळ फोन करून बोलव असे सांगितले. गाडी अडविल्याने झीमरी घटनास्थळी गेले असता अजहर शेख यांच्यासोबत वाद झाला.

त्यानंतर खंडणीच्या पैशांवरून दोघांमध्ये हाणामारी झाली. विशेष म्हणजे, अजहर शेखने ऑक्टोबर २०२२ मध्ये ३ लाखाची खंडणी मागितली होती. त्यातील अडीच लाख रूपये छोटा बाजार चौकातील बंगलोर बेकरी जवळ तेव्हाच दिले होते. त्यानंतर २८ ऑगस्ट २३ रोजी पुन्हा खंडणीची मागणी केली. तेव्हा रोख ५० हजार रूपये दिले. दरम्यान ऑक्टोबर २०२२ पासून आजपर्यंत वेळोवेळी ३ लाख रूपये खंडणी दिली. त्यानंतर पुन्हा पैशांची मागणी केल्याची तक्रार झीमरी यांनी केली. या तक्रारीच्या आधारावर शहर पोलिसांनी अजहर शेख विरुध्द खंडणीचा गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा तपास शहर ठाण्यातील उपनिरीक्षक दीपक चालुरकर करीत आहेत.