बोगस बियाणे देऊन शेतकऱ्याची फसवणूक, २ लाखांचे नुकसान

0
7

देवरी -तालुक्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. मात्र, या भाताच्या आगारातही आता बोगस बियाणांचा सुळसुळाट झालाय. तालुक्यातील बोरगाव येथील शेतकऱ्याने सीड्स कंपनीचे शिवाजी तांदळाचे वाण शेतात पेरले. मात्र, शिवाजी वाणाचे भात न येता खबरा धान उगवल्याने कंपनीने शेतकऱ्याची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्याने कंपनीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तसेच बियाणे कंपनीविरुद्ध न्यायालयात जाण्याचा इशारा शेतकऱ्याने दिला आहे.

देवरी येथील गौरीशंकर दहीकर हे प्रगतिशील शेतकरी असून, दरवर्षी ते आपल्या बोरगाव ( डवकी) येथील शेतीत दोन लक्ष रुपयांचे उत्पन्न घेतात. यावर्षी त्यांनी सीड्स कंपनी तेलंगणाचे शिवाजी नावाचे धान पिकाचे १५० किलो वाण कृषी केंद्रातून खरेदी करुन चार एकर शेतात रोवणी केली. नियमानुसार वेळेवर धानाला खत, पाणी व औषध फवारणी केली. त्यानुसार धानाची माफक वाढ होऊन धानाची चांगली वाढ झाली.

मात्र, जेव्हा धानाच्या लोंबा यायला लागल्या तेव्हा शिवाजी प्रजातीचे धान निघण्याऐवजी खबरा पांढरे लोंब बाहेर आली. हे बघून आजूबाजूचे शेतकरी आश्चर्यचकित झाले. जवळपास ९० टक्के खबरा असल्याने या कंपनीने यात घोळ केला असल्याचा आरोप केला आहे. बोगस बियाणे शेतकऱ्याला पुरवठा केल्याने दहीकर यांचे जवळपास दोन लक्ष रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

कंपनीकडे केली तक्रार

दहीकर यांनी याची सदर सीड्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना तक्रार केली असता कंपनीचे अधिकारी बोरगाव येथील शेती पाहायला ९ ऑक्टोबर रोजी आले. त्यांनी पाहणी केली व मान्य सुद्धा केले की खबरा ९० टक्के आहे. त्यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोलून शेतकऱ्यांचे समाधान करण्यास सांगितले. तीन – चार दिवसांनंतर फोन करून शेतकऱ्याने विचारले असता तुमच्या बियाणांचा खर्च कंपनीकडून भरून देऊ, असे उडवाउडवीचे उत्तर मिळाले.

दहीकर यांनी आपल्या चार एकर शेतात या कंपनीचे बियाणे लावले. मात्र, ते बोगस निघाल्याने आणि ९० टक्के खबरा झाल्याने त्यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. पण, कंपनी फक्त वीस ते पंचवीस हजार रुपये बियाणांची रक्कम देण्यास तयार आहे. परंतु, दहीकर यांचे दोन लक्ष रुपयांचे नुकसान झाल्याने त्यांनी कृषी विभाग देवरी, पंचायत समिती देवरी तसेच पोलिस स्टेशन देवरी येथे कंपनीविरुद्ध फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. तसेच कंपनीच्या विरोधात ग्राहक न्यायालयात दाद मागणार असल्याचे शेतकरी गौरीशंकर दहीकर यांनी सांगितले.