ऑनलाइन जुगार प्रकरणातील बुकी सोंटू जैनचे न्यायालयात आत्मसमर्पण

0
8

नागपूर: ऑनलाइन जुगाराच्या नादी लावून व्यापारी विक्रांत अग्रवाल यांची ५८ कोटींनी फसवणूक करणारा बुकी आणि ठकबाज अनंत ऊर्फ सोंटू जैन रा.गोंदिया याने सोमवारी दुपारी न्यायालयात आत्मसमर्पण केले. न्यायालयीन आदेशानंतर गुन्हेशाखा पोलिसांनी सोंटूला अटक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.डायमंड एक्सचेंज डॉट कॉम या ऑनलाइन जुगार साइटच्या आधारे सोंटूने अग्रवाल यांची फसवणूक केली.अग्रवाल यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच सोंटू दुबईला पसार झाला. २२ जुलैला पोलिसांनी सोंटूच्या गोंदियातील निवासस्थानी छापा टाकला. निवासस्थानाहून पोलिसांनी १७ कोटींची रोख, १४ किलो सोने व २९४ किलो चांदी जप्त केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या चार बँक लॉकरची झडती घेतली. लॉकरमधूनही पोलिसांनी ८५ लाख व साडेचार कोटींचे सोने जप्त केले. सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर सोंटूने वकिलामार्फत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतला.उच्च न्यायालयानेही त्याचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर सोंटूने सर्वोच्च न्यायालयान जामिनासाठी अर्ज दाखल केला. ९ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयानेही त्याचा जामीन फेटाळत सात दिवसांत आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले. सोमवारी मुदत संपल्याने सोंटूने वकिलामार्फत प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात आत्मसमर्पण केले.कुख्यात दाऊद टोळीचा सदस्य व डायमंड एक्सचेंज डॉट कॉम या ऑनलाइन जुगार साइटचा सूत्रधार नईम ऊर्फ नदीम याच्यापर्यंत हे ऑनलाइन जुगाराचे रॅकेट चालते. भारतात ऑनलाइन जुगाराची जबाबदारी बुकी राकेश राजकोट ऊर्फ आरआर याच्याकडे आहेत. आरआरही पोलिसांना हवा आहे. सोंटूच्या अटकेनंतर पोलिस या ऑनलाइन जुगाराचे पाळेमुळे शोधणार आहे.