रेल्वेच्या सिग्नल प्रणालीचे रीले चोरी करणाऱ्या 3 चोरट्यांना गंगाझरी येथून अटक

0
11

गंगाझरी पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल पोलिसांची संयुक्तरित्या उल्लेखनिय उत्कृष्ठ कामगिरी-

गोंदिया,दि.17ः  गंगाझरी पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या लेव्हल रेल्वे क्रॉसिंग गेट 515,दांडेगाव,ता. जिल्हा गोंदिया येथील रिले रूमचे कुलूप तोडून 14 आँक्टोबंरच्या रात्री 23.30 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करून रेल्वे रॅक मधील 41 रिले एकूण किंमती – 98,000/- रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली.याप्रकरणी रेल्वे सुरक्षा बल, गोंदिया येथे अपराध क्रमांक 12/2023 रेल्वे मालमत्ता (अवैध ताबा) कायदा 1966 कलम 3(a) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.रेल्वेच्या महत्वपूर्ण सिग्नल प्रणालीच्या रिले चोरीच्या घटनेमुळे काही काळाकरीता हावडा – नागपूर रेल्वे मार्गावरील रेल्वेची वाहतूक व्यवस्था खोळंबून रेल्वेची मोठी दुर्घटना होता होता थोड्क्यात टळली.रेलवे सुरक्षा बल व गंगाझरी पोलिसांनी तत्काळ वरिष्ठांना माहिती देत घटनास्थळ गाठले.

वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याच्या तपासात पोलीस स्टेशन गंगाझरीचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी रेल्वे सुरक्षा बलच्या स्टाफला मदत केली. रेल्वे सुरक्षा बल व पोलीस स्टेशन गंगाझरी पोलीस पथक असे संयुक्तरित्या आरोपी शोध मोहीम राबविण्यात येऊन कार्यवाही करून आरोपी इसम नामे-सलाम रफिक शेख, वय 24 वर्ष, रा. गंगाझरी,जितेंद्र उर्फ जितू नरेंद्र गिरी, वय 34 वर्ष, रा. गंगाझरी, व ऋषभ उर्फ सोनू शशिकांत सिंह, वय 24 वर्ष, रा. गंगाझरी व एक विधी संघर्ष बालक अश्या चौघांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना विश्वासात घेऊन त्यांच्या कडे प्रस्तुत गुन्ह्यासंबंधाने विचारपूस केली असता, त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले.रेल्वे सुरक्षा बल अधिकारी, अंमलदार यांनी नमूद आरोपींना गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला संपूर्ण माल हस्तगत केला.

सदरची संयुक्त कार्यवाही रेल्वे पोलिस प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी बोर्ड अधिकारी तसेच जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गंगाझरीचे पोनि महेश बनसोडे, सफौ मनोहर अंबुले, पोहवा सुभाष हिवरे, भूपेश कटरे, पोशि प्रशांत गौतम तसेच रेल्वे सुरक्षा बल चे पोनि अनिल पाटील, नंदबहादूर, विनोदकुमार तिवारी, पोउपनि राहुल कुमार, दुबे, मेश्राम, सफौ एस. सिडाम, पोहवा रायकवार, पोशि नसीर खान, यांनी कारवाईत सहभाग घेतला. घटनास्थळी रेल्वे सुरक्षा बलचे वरीष्ठ अधिकारी डी.आय.जी भवानी शंकर नाथ व मंडल सुरक्षा आयुक्त  आर्य यांनी भेट दिली.