mseb Dy. Ee २० हजार रुपयांची लाच घेताना अटक

0
21

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या आलापल्ली कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता (वर्ग २) विनोदकुमार भोयर (४७ वर्ष) यांना २० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.१७) करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार, तक्रारदाराला त्यांचे घरगुती वीज मीटर फॅाल्टी असल्याचे सांगून उपकार्यकारी अभियंता भोयर यांनी २ लाख २० हजार रुपयांचा दंड भरावा लागेल, असे सांगितले. त्यानंतर दंडाची रक्कम कमी करून ७३ हजार ६९८ रुपये केली. त्या दंडाची रक्कम कमी केल्याचा मोबदला म्हणून ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यादरम्यान तक्रारदाराने गडचिरोली एसीबीसोबत संपर्क करून तक्रार दिली.

पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले यांच्या पर्यवेक्षणात पो.निरीक्षक शिवाजी राठोड यांनी तक्रारीची शहानिशा केली. त्यानंतर सापळा रचण्यात आला. पडताळणीदरम्यान भोयर यांनी ४० हजार रुपये लाचेची मागणी पंचासमक्ष केली. त्या रकमेतील पहिला टप्प्यात २० हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

संध्याकाळी अहेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान भोयर यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे असलेल्या निवासस्थानाचीही चंद्रपूर एसीबीकडून झडती घेतली जात आहे.

या कारवाईत सहायक फौजदार सुनील पेद्दीवार, हवालदार नत्थु धोटे, राजेश पदमगिरवार, अंमलदार किशोर ठाकूर, संदीप उडान आदींनी सहकार्य केले.