गडचिरोली : विद्युत प्रवाहाद्वारे वाघाची शिकार केल्याची धक्कादायक घटना चातगाव वनपरिक्षेत्रातील अमिर्झा बिटात मंगळवार २४ ऑक्टोबररोजी उघडकीस आली. घटनास्थळी आढळलेल्या मृत वाघाचे शिर व तीन पंजे गायब होते. रानटी डुकराच्या शिकारीसाठी हा सापळा रचण्यात आला होता पण त्यात वाघ अडकल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तवला आहे.
गडचिरोली वन विभागांतर्गत येणाऱ्या चातगाव वनपरिक्षेत्रात गेल्या अनेक महिन्यांपासून वाघाचा वावर आहे. परिसरातील नागरिकांना अधूनमधून या वाघाचे दर्शन होत होते. दरम्यान, आज मंगळवारी सकाळच्या सुमारास जंगलात गेलेल्या गुराख्याला वाघ मृतावस्थेत आढळून आला. त्याने गावात याबद्दल माहिती दिली असता तात्काळ वनाधिकाऱ्यांना कळविण्यात आले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पण पंचनामा केला. यावेळी मृत वाघाचे तीन पंजे व शिर गायब होते. दरम्यान वन विभागाचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. यावेळी सहायक वनसंरक्षक संकेत वाठोरे व वन विभागाने अधिकारी उपस्थित होते.