खोक्याची लंका दहन करणारा धगधगता निखारा माझ्याकडे;उद्धव ठाकरेंचा दसरा मेळाव्यातून शिंदे गटावर घणाघात

0
3

मुंबई:– शिवसेनेच्या ठाकरे गटाचा दसरा मेळावा मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्कवर सुरु आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी राज्यभरातील शिवसैनिकांनी हजेरी लावली आहे. संपूर्ण राज्यभरातील नागरिकांचं लक्ष लागलेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. ‘खोक्याची लंका दहन करणारा धगधगता निखारा माझ्याकडे आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं.

उद्धव ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच आपण जरांगे पाटलांना धन्यवाद देत असल्याचं नमूद केलं. “मी भाषणाच्या सुरुवातीला आवर्जून मनोज जरांगे पाटलांना धन्यवाद देतोय. अत्यंत समजूदारपणे त्यांनी आंदोलन चालू ठेवलंय. आज त्यांनी धनगरांनाही साद घातली आहे ही चांगली गोष्ट केली. जालन्यात हे आंदोलन शांततेत चालू होतं. जसं जालियनवालामध्ये घुसून इंग्रजांनी अत्याचार केला होता, त्याचप्रमाणे आंतरवलीमध्ये शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर सरकारने पाशवी हल्ला केला होता, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी जखमी आंदोलकांना भेटायला गेले असताना दिसलेलं चित्र मेळाव्यात सांगितलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, ५७ वर्षे झाली. पण आपण परंपरा थांबू दिली नाही. मोडता घालण्याचा प्रयत्न झाला, पण त्यांना मोडीत काढून परंपरा चालू ठेवली आहे. पुढची अनेक वर्षे सुरूच ठेवणार आहोत. सर्वप्रथम दसऱ्याच्या शुभेच्छा. हा मेळावा या संस्कृतीचं विराट दर्शन आहे. आपण खोकासुराचं दहन करणार आहोत. रामाने रावणाचा वध केला. रावण सुद्धा शिवभक्त होता. पण तो शिवभक्त असूनही रामाला त्याचा वध करावा लागला. कारण रावण माजला होता.

आपली शिवसेना पळवण्याचा प्रयत्न होतोय. प्रभू श्रीरामचंद्रांनी धनुष्यबाणाने रावणाचा वध केला होता. तो धनुष्यबाणही यांनी चोरला आहे. ज्याप्रमाणे हनुमानाने रावणाची सोन्याची लंका पेटवली होती. तशीच तुमची खोक्याची लंका दहन करण्यासाठी इथं शिवसैनिक जमला आहे. सध्या क्रिकेटचा मौसम आहे. वर्ल्डकप सुरू आहे. मधेमधे जाहिराती असतात. काही जाहिराती पाठ होतात. एक जाहिरात अक्षय, अजय देवगण, शाहरूख खान आमच्याकडेही तिघेही बसलेत. त्यांना कमला पसंत आहे, यांना कमळा पसंत आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला टोला लगावला.

देशात लोकशाही राहणार की नाही?

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे नाव न घेता टीका केली. सर्वोच्च न्यायालयाने यांचे कानपट फोडले. तरी सकाळी उठून काही झालं नसल्यासारखं वागतात. एक लवाद जर सुप्रीम कोर्टाचे ऐकत नसेल तर देशात लोकशाही राहणार आहे की नाही, असा उद्गविन सवाल ठाकरे यांनी केला. भारत मातेची लोकशाही टिकणार की नाही ? 30 तारखेला बघू.. जनतेच्या न्यायालयात जाऊ द्या असं मी म्हणत असल्याचे ठाकरे यांनी म्हटले.

घराणेशाहीच्या मुद्यावर मोदींवर बोचरी टीका

पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपकडून राजकीय घराणेशाहीवर टीका केली जात आहे. या घराणेशाहीच्या टीकेवर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, सगळीच घराणी वाईट नसतात.. तुम्हाला घराणेशाहीचा तिटकारा असेल तर तुमच्याकडे आमच्याकडून आलेल्या घराणेशाहीचे काय करणार? सद्दाम, मुसोलिनी, हिटलर यांना घराणेशाहीची पार्श्वभूमी होती का असा प्रश्न त्यांनी केला. ज्यांच्या घराण्याचा आगापिछा नसतो अशी लोक घातक असतात. जर्मनी हे त्याचे उदाहरण आहे. जर्मनीत आता हिटलरचा तिटकारा आहे. त्यालाही पाशवी बहुमत मिळाले. त्यानेदेखील अंधभक्त तयार झाले असल्याचे त्यांनी म्हटले.

खुर्ची डळमळीत असेल तर देश मजबूत

उद्धव ठाकरे यांनी आघाडीच्या राजकारणाच्या बाजूने भाष्य केले. एकाच पक्षाला आता पाशवी बहुमत असणारे सरकार नको असे त्यांनी स्पष्ट म्हटले. जेव्हा खुर्ची डळमळीत असते तेव्हा देश मजबूत होतो. पी. व्ही. नरसिंहा राव, अटलबिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंह यांच्या काळात आघाड्यांचे सरकार होते. मात्र, या काळात देश मजबूत झाल्याकडे त्यांनी म्हटले. 2014 मध्ये मोदींना वेड्यासारखा पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी भाष्य केले. येत्या निवडणुकीत आपलं सरकार येणार. आपलं सरकार आणणार म्हणजे आणणारच असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

भाजपला इशारा

उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना नेते, शिवसैनिकांना मिळत असलेल्या कारवाईच्या धमक्यांवर त्यांनी भाष्य केले. ठाकरे यांनी म्हटले की, आज दमदाट्या करणाऱ्यांना सांगतो, आमच्या लोकांना विनाकारण आज त्रास दिला तर आमचं सरकार आलं तर तुम्हालाही उलट टांगू, असा इशारा त्यांनी दिला.

सुरतेला पळून जाणारे महाराष्ट्राचे हित काय करणार

छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली त्याचा बदला म्हणून मुंबई,महाराष्ट्र लुटली जात असल्याचे ठाकरे यांनी म्हटले.  मुंबईला दिल्लीसमोर उभं करायचं आहे.. हा त्यांचा डाव आहे. हे आम्ही कधीही होऊ देणार नाही. मुंबईला दुसऱ्या मार्गाने तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. महापालिकेच्या ऐवजी आता नीती आयोग मुंबईचा विकास करणार असल्याचे त्यांनी म्हटले. एका  बिल्डरला पालकमंत्री केलं आहे. त्याचं ऑफिस मुंबई महापालिकेत आहे. मुंबई बिल्डरांना देण्यासाठीचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.