विक्रांत अग्रवालची चौकशी करण्यास पोलिसांची टाळाटाळ? डायमंड एक्स्चेंज गेमींग अ‍ॅप प्रकरण

0
5

नागपूर: तांदूळ व्यापारी विक्रांत अग्रवाल हा आंतरराष्ट्रीय बुकी अनंत ऊर्फ सोंटू जैन याला ५८ कोटी रुपये हारला होता. त्यामुळे अवैध धंद्यातून हजारो कोटी रुपये कमाविणाऱ्या सोटूला अद्दल घडविण्यासाठी विक्रांतने काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मदत घेतली. पूर्वनियोजन करून सोंटू जैनच्या अवैध साम्राज्याला पोलिसांच्या माध्यमातून सुरुंग लावल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळेच विक्रांतची चौकशी करण्यास गुन्हे शाखा टाळाटाळ करीत आहे.

डायमंड एक्स्चेंज गेमींग अ‍ॅपच्या माध्यमातून बनावट लिंक पाठवून महाराष्ट्रासह देशातील अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक करीत हजारो कोटी रुपये कमविणारा सोंटू जैनला अतिआत्मविश्वास नडला. गोंदीया पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी महिन्याकाठी ठरलेली ‘भेट’ निश्चित करीत त्याने अवैध साम्राज्य निर्माण केले होते. गोंदीयातील तांदूळ व्यापारी विक्रांत अग्रवालही सोंटूचा मित्र होता. सोंटूने विक्रांतला पैसे कमविण्याचा सोपा उपाय म्हणून डायमंड एक्स्चेंज गेमींग अ‍ॅपवर पैसे गुंतवण्यास सांगितले. विक्रांतच्या प्राथमिक तक्रार अर्जानुसार त्याने तब्बल ७७ कोटी रुपये सोंटूच्या बेटिंग अ‍ॅपवर लावले होते. ती रक्कम सोंटूने बनावट लिंक पाठवून हडपल्याचा आरोपही केला होता.

मात्र, ५ कोटी रुपयांचे कर्ज फेडू न शकल्याने कर्जबुडव्या विक्रांतची राईस मील बँकेने लिलावात काढून कर्जाची रक्कम वसूल केली. त्यामुळे विक्रांतकडे ७७ कोटींची रक्कम आली कुठून? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या घडामोडींवरून सोंटू विरुध्द केलेल्या आरोपांमध्ये कितीपत सत्यता आहे, याची शहानिशा पोलिसांनी न करता थेट सोंटूवर धडक कारवाई केली. सोंटूकडून प्राथमिकदृष्ट्या जवळपास १०० कोटीं रुपयांची संपत्ती पोलिसांनी जप्त केली.

विक्रांतची सोंटूविरुद्ध खेळी?

विक्रांत अग्रवालने काही पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांशी हातमिळवणी केली. त्याने सोंटूकडे असलेल्या अवैध संपत्तीबाबत आणि अवैध व्यवसायाबाबत पोलिसांना माहिती दिली. कारवाई केल्यास हजारो कोटींचे घबाड पोलिसांच्या हाती लागणार असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामध्ये विक्रांत आणि पोलीस अधिकाऱ्यांना ‘लाभ’ होणार हे निश्चितच होते. पूर्वअभ्यास आणि नियोजन करून विक्रांतची चौकशी न करता सोंटू जैनच्या अवैध साम्राज्यावर कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे.

सोंटूला मिळाली ‘व्हीव्हीआयपी ट्रिटमेंट’

न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने सोंटूकडे शरणागती पत्करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे सोंटूने आपल्या खास व्यक्तीच्या माध्यमातून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निरोप पाठवला. सोंटूला अटक न करता न्यायालयात आत्मसमर्पण करण्याची सुविधा देण्यात आली. त्यांतर पोलीस कोठडीत त्याला ‘व्हीव्हीआयपी ट्रिटमेंट’ देण्यासाठी मोठी रक्कम घेण्यात आल्याची चर्चा पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आहे.

सोंटू जैनकडे गुंतवलेल्या रकमेबाबतचे विवरण पोलिसांकडे दिले आहे. मी तक्रारदार असून माझी फसवणूक झाली आहे. सोंटू जैनवर माझ्या तक्रारीवरूनच सोंटूवर गुन्हा दाखल आहे. मी तपासात पोलिसांना सहकार्य करीत आहे. – विक्रांत अग्रवाल