नागपूर दि. 1 नोव्हेंबर 2023:- राज्य शासनाने ई ऑफीस प्रणाली सुरू केली असून त्यात पेपरलेस व्यवहार करण्यावर भर दिला आहे. त्या दिशेने महावितरणने वीज बिलांच्या बाबतीत यापूर्वीच काम सुरू केले असून त्यासाठी गो ग्रीन योजनेच्या माध्यमातून लाभ घेऊन वीज ग्राहकांनी पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.
महावितरणच्या गो ग्रीन योजनेत ग्राहकांनी छापील कागदी बिलाच्या ऐवजी ईमेलने येणाऱ्या पेपरलेस बिलाचा पर्याय स्वीकारला तर त्यांना कागदी बिल पाठविणे बंद केले जाते व प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत देण्यात येते. महावितरणच्या नागपूर प्रादेशिक विभागांतर्गत असलेल्या विदर्भातील अकराही जिल्ह्यातील मिळून एकूण 54 हजार 275 ग्राहक या योजनेत सहभागी होत वीजबिलात मासिक दहा रुपये सवलत मिळवित आहेत, यात नागपूर परिमंडलातील 19 हजार 72 ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्या पाठोपाठ अकोला परिमंडलातील 13 हजार 251, अमरावती परिमंडलातील 12 हजार 79, चंद्रपूर परिमंडलातील 5 हजार 135 तर गोंदीया परिमंडलातील 4 हजार 738 ग्राहकांचा समावेश आहे.
ई ऑफीस प्रणालीमध्ये प्रत्यक्ष कागदाचा वापर न करता माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पेपरलेस कामावर भर आहे. वीज ग्राहकांनी गो ग्रीनच्या सवलतीचा लाभ घेतला तर छापील बिले कमी होऊन कागदाचा वापर कमी होईल व पेपरलेस कामाला चालना मिळेल तसेच पर्यावरणाचे रक्षण होईल.
बिलाच्या रंगीत प्रिंटची ही सोय
वीज ग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेल द्वारे प्राप्त झालेले दर महिन्याचे वीज बिल संगणकात सॉफ्ट कॉपी मध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर चालू महिन्याचे वीज बिल मूळ स्वरुपात उपलब्ध असते. आवश्यकतेप्रमाणे वीज ग्राहकांना ते डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट घेण्याची सोय आहे.
‘गो ग्रीन’ होण्यासाठी काय करावे?
ज्या ग्राहकांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना महावितरणच्या मोबाइल अॅपद्वारे किंवा संकेत स्थळाच्या https://pro.mahadiscom.in/Go- Green/gogreen.jsp या लिंक वर जाऊन ग्राहक क्रमांक आणि बिलिंग युनिट ही माहिती भरून नोंदणी करता येते. याबाबतची अधिक माहिती महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. ग्राहकाला हवे तेव्हा त्याला ईमेलने आलेल्या बिलाचा प्रिंट घेता येते. त्यासोबत सर्वच ग्राहकांना त्यांच्या बिलाविषयी नियम व माहिती देणारे एसएमएसही पाठविले जात आहेतच. ग्राहकाला परत जुन्या प्रकारे छापील बिल हवे असल्यास याच लिंक वरून त्याला नोंदणि रद्द करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. गो ग्रीन या योजनेत सहबागी होत ग्राहकांनी आपल्या मासिक वीज बिलात दहा रुपये बचत करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनातही सहबागी होण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.
.उपमुख्य जनसंपर्क अधिकारी