दुचाकी आदळल्या,चार मृत्युमुखी,चांदूरबाजार-अमरावती मार्गावरील घटना

0
12
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 अमरावती,दि. २ : दुचाकींची समोरासमोर धडक होऊन घडलेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याची घटना चांदूरबाजार-अमरावती मार्गावर सोमवारी रात्री १ वाजताचे सुमारास घडली. अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

सौरभ किशोर मसराम (२२, रा. मासोद, अमरावती), शेख जुनेद शेख बिसमिल्ला खान (२१, ताजनगर, चांदूरबाजार), गोलू उर्फ धीरज राजू टवलारे (२०, शेवती, नांदगाव पेठ) व शेख नसीम शेख हसन (४०, रा. पिंपळपुरा, चांदूरबाजार) अशी मृतकांची नावे आहे. अपघातात शेख नजीर शेख हसन (५५, रा. ताजनगर, चांदूरबाजार) व ओम रवींद्र मसराम (२०, रा. मासोद, अमरावती) असे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

सौरभ मसराम हा दुचाकी (क्र. एमएच २७ / बीजे ४९५४) आपल्या दोन सहकाऱ्यांसह बहिरमवरुन अमरावती मार्गाने मासोद येथे जात होता. शेख जुनेद शेख बिसमिल्ला खान हे दुचाकी (क्र. एमएच २७/ डीजी ९७०१) ने आपल्या दोन सहकाऱ्यांसह लग्नाच्या स्वागत सभारंभातून अमरावतीवरुन चांदूरबाजारकडे येत होते. चांदूरबाजारवरुन दोन किलोमिटर अंतरावर असलेल्या एका बारसमोर दोघांच्याही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात सौरभसह त्यांच्या दुचाकीवरील गोलू आणि शेख जुनेदसह त्यांच्या दुचाकीवरील शेख नसीम यांचा जागीच मृत्यू झाला. तर सौरभ यांच्या दुचाकीवरील रवींद्र व शेख जुनेद यांच्या दुचाकीवरील शेख नजीर हे दोघे गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच चांदूरबाजारचे साहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल निर्मळ यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले. याबाबत माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल नवगीरे घटनास्थळावर पोहोचले. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.