भरधाव दुचाकीची ट्रकला धडक; तीन तरुणांचा मृत्यू

0
25

गडचिरोली : विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर भरधाव दुचाकी धडकून झालेल्या भीषण अपघातात एकाच नातेसंबंधातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील मुरखळा गावाजवळील वळणावर मंगळवारी रात्री ८ ते ९ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. अक्षय दसरथ पेंदाम (२३), अजित रघू सडमेक (२३), अमोल अशोक अर्का (२०) सर्व राहणार गोविंदगाव अशी मृत तरुणांची नावे आहेत.माहितीनुसार, ९ जानेवारी रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास अक्षय, अजित आणि अमोल नुकत्याच घेतलेल्या नव्या दुचाकीवरून भरधाव वेगाने गडचिरोलीच्या दिशेने येत होते. दरम्यान, मुरखळा गावाजवळच्या वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर त्यांची दुचाकी धडकली. यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचे दोन तुकडे झाले. मृत तरुण अहेरी तालुक्यातील गोविंदगावचे रहिवासी होते. तसेच एकाच नातेसंबंधातील असल्याचे कळते.घरातील तरुण मुलांच्या अपघाती निधनाने कुटुंबीयांना शोक अनावर झाला होता. यातील एकाचे वडील पोलीस विभागात कार्यरत आहेत. अपघाताची माहिती मिळताच रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती.