पीएचडी फेलोशिप परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप करत शेकडो विद्यार्थ्यांचे आंदोलन

0
8

नागपूर : राज्य शासनाच्या बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून पीएच.डी.धारक विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या फेलोशिपसाठी २४ डिसेंबर रोजी पुणे, छत्रपती सांभाजीनगर, औरंगाबाद आणि नागपूर येथे चाळणी परीक्षा घेण्यात आली. मात्र, पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडून घेण्यात आलेल्या या परीक्षेत २०१९ ला झालेल्या सेट परीक्षेची प्रश्नपत्रिका जशीच्या तशी विद्यार्थ्यांना दिली गेली. मात्र, त्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला. तसेच परीक्षा रद्द करण्याची मागणी केली.

त्यावर बार्टीचे महासंचालक सुनील वारे, सारथीचे वरिष्ठ अधिकारी आणि महाज्योती संस्थेचे प्रमुख अधिकारी आणि विद्यापीठाचे पदाधिकारी यांनी याबाबत चर्चा करून पुन्हा परीक्षा घेण्याचे निश्चित केले. त्यानुसार १० जानेवारीला पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरातील कमला नेहरू महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर सकाळी परीक्षेला सुरुवात झाली. मात्र विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिली असता ती सीलबंद लिफाफ्यात नसल्याने विद्यार्थ्यांनी यावर आक्षेप घेतला. त्यानंतर ए आणि बी या दोन ग्रुपची प्रश्नपत्रिका ही सीलबंद लिफाफ्यात होती. मात्र सी आणि डी या ग्रुपची प्रश्नपत्रिका ही खुली होती. त्यामुळे पेपर विद्यार्थ्यांना देण्याआधीच फोडण्यात आला असा आक्षेप परीक्षार्थी उमेदवारांनी घेतला. यामुळे परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी कमला नेहरू महाविद्यालयाच्या बाहेर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. तसेच परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या विरोधात नारेबाजी केली.

विशेष म्हणजे दुसऱ्यांदा घेण्यात आलेल्या या परीक्षेतही असा गोंधळ उडाल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ही परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाच्या वतीने घेण्यात आली होती. सुरुवातीला फेलोशिप चाळणी परीक्षा अतितत्काळ विहित काल मर्यादेत आयोजन करण्याबाबत सेट विभागाला सूचित करण्यात आले होते. पीएच.डी. फेलोशिप चाळणी परीक्षा आणि सेट या दोन्ही परीक्षा भिन्न कारणांसाठी आयोजित केल्या जात असल्याने प्रश्नांची पुनरावृत्ती झाल्याने कोणत्याही विद्यार्थास फायदा अथवा नुकसान संभवत नाही. तसेच ही चाळणी परीक्षा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. त्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता येत्या १० जानेवारी २०१४ रोजी पुन्हा परीक्षेचे आयोजन करण्याचे ठवले होते. मात्र आता या परीक्षेतही प्रश्नपत्रिका आधीच फुटल्याचा उमेदवारांचा आक्षेप आहे. यामुळे परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरातील कमला नेहरू महाविद्यालयाच्या बाहेर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. तसेच परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या विरोधात नारेबाजी केली.