कल्लु यादव गोळीबार प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या नऊ; बंदुक व दोन मोटारसायकल जप्त

0
17

गोंदिया,दि.15-  माजी नगरसेवक लोकेश ऊर्फ कल्लु यादव यांच्यावर गोळीबार करणाऱ्या व आरोपींना साथ देणाऱ्या आरोपींंचे अटक सत्र गोंदिया शहर पोलिसांनी चालविले. आतापर्यंत या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या नऊ झाली आहे.तर आतापर्यंतच्या तपासात पुढे आलेल्या दहा आरोपींपैकी एक मुख्य आरोपी प्रशांत मेश्राम हा अद्यापही फरार आहे.

या प्रकरणात ज्या मावझर बंदुकीतून गोळीबार केली ती बंदुक व गुन्ह्यासाठी वापरलेल्या दोन मोटारसायकल जप्त करण्यात आल्याची माहिती गोंदिया शहर पोलिस ठाण्यात आयोजित पत्रपरिषदेत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांनी दिली आहे. ११ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सावलानी किराना दुकानाच्या समोर हेमू कॉलनी यादव चौक गोंदिया येथे दोन अज्ञात आरोपींनी संगनमत करुन माजी नगरसेवक जखमी लोकेश ऊर्फ कल्लु सुंदरलाल यादव (४२) रा. यादव चौक गोंदिया यांच्यावर बंदुकीने गोळीबार केला. या प्रकरणात १२ जानेवारी रोजी चार आरोपींना अटक करण्यात आली.गोळीबार करण्यासाठी वापरण्यात आलेली पहिली मोटारसायकल एम.एच.३५ एटी ९८१६ हिलचा वापर करण्यात आला. गोळीबार केल्यानंतर नागपूरला पळून जाण्यासाठी दुसरी गाडी बदलण्यात आली. त्यात दुसरी गाडी एम एच ३५ झेड ००१३ हिचा वापर करण्यात आला.

१३ जानेवारी रोजी दोन आरोपींना, एका आरोपीला १४ जानेवारी तर १५ जानेवारीला दोन आरोपींना अटक करण्यात आली. आतापर्यंत तपासात आलेल्या दहा आरोपींपैकी नऊ आरोपींना अटक करण्यात आली. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रशांत मेश्राम हा फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात गोंदिया शहरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मंगेश वानखडे, पोलीस हवालदार जागेश्वर उईके, कवलपालसिंग भाटीया, सुदेश टेंभरे, निशिकांत लोंदासे, प्रमोद चव्हान, दिपक रहांगडाले, महिला पोलीस हवालदार रिना चौव्हाण, पोलीस शिपाई दिनेश बिसेन, अशोक रहांगडाले, सुभाष सोनेवाने, मुकेश रावते, करण बारेवार, सनोज सपाटे तसेच स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया येथील पथक, सायबर सेल गोंदिया यांनी केली आहे.

अटक आरोपींची नावे
१२ जानेवारी रोजी आरोपी गणेश शिवकुमार शर्मा (२१) रा. भिडी ले आउट वरोडा ता. कळमेश्वर जि. नागपूर, अक्षय मधुकर मानकर (२८) रा. सम्राट ग्राउंड शिक्षक कॉलोनी कळमेश्वर जि. नागपूर, धनराज ऊर्फ रिंकू व राजेंद्र राउत (३२) रा. कुंभारेनगर गोंदिया, नागसेन बोधी मंतो (४१) रा. गौतम बुध्द वाॅर्ड, श्रीनगर गोंदिया, १३ जानेवारी रोजी शुभम विजय हुमणे (२७) रा. भिमनगर, गोंदिया, सुमित ऊर्फ पंछी विकास डोंगरे (२३) रा. कुंभारेनगर, गोंदिया, १४ जानेवारी रोजी रोहीत प्रेमलाल मेश्राम (३२) रा. कुंभारेनगर, गोंदिया व १५ जानेवारी रोजी नितेश ऊर्फ मोनु लखनलाल कोडापे (२८) रा. विहीरगाव, तिरोडा ह.मु. कुंभारेनगर, गोंदिया व मयुर ऊर्फ सानू विजय रंगारी (२७) रा. सिंगलटोली, आंबेडकर वाॅर्ड, गोंदिया याला अटक केली.

कुंभारेनगरात लपविली होती बंदूक
रोहीत मेश्राम व धनराज ऊर्फ रिंकू राऊत या दोघांच्या सांगण्यावरून नागपूरच्या दोन्ही आरोपींजवळील बंदूक तिरोडा तालुक्याच्या विहीरगाव येथील परंतु सद्या गोंदियाच्या कुंभारेनगरात वास्तव्यास असलेल्या नितेश ऊर्फ मोनु लखनलाल कोडापे (२८) याच्या घरी ती बंदूक लपवून ठेवण्यात आली.

पंछी व शुभमने आरोपींसाठी केली दुचाकीची सोय
आरोपी गणेश शिवकुमार शर्मा व अक्षय मधुकर मानकर या दोघांना गुन्हा करण्यासाठी आरोपी रोहीत मेश्राम, धनराज ऊर्फ रिंकू राजेंद्र राउत यांच्या सांगण्यावरुन शुभम विजय हुमणे व सुमित ऊर्फ पंछी विकास डोंगरे या दोघांनी दुचाकीची व्यवस्था केली होती.गोळीबार केल्यानंतर त्या दोन्ही आरोपींना नागपूरला पळून जाण्यासाठी आरोपी मयूर ऊर्फ सानू विजय रंगारी (२७) रा. सिंगलटोली, आंबेडकर वाॅर्ड, गोंदिया याने दुसरी दुचाकी एमएच ३५ झेड ००१३ ची सोय करून दिली.

बंदुकीसह तीन जवंत काडतूस जप्त
आरोपी रोहीत मेश्राम याच्या कडून गुन्हयात वापरलेली एक पिस्टल व ३ नग जिवंत काडतुस व दोन मोटार सायकल, ४ नग मोबाईल जप्त करण्यात आले. या नऊही आरोपींना २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गराड करीत आहेत.