वाहून गेलेल्या मुलाचा अखेर मृतदेहच गवसला…

0
13

नागपूर : पतंग पकडण्याच्या नादात कालव्यात वाहून गेलेल्या आठ वर्षीय मुलाचा  मृतदेहच आढळला. अग्निशमन दल आणि कोराडी पोलिसांनी दोन दिवस सलग मृतदेहाचा शोध घेतला. अखेर जगदीश खरे यांच्या मदतीने मृतदेह शोधण्यात यश आले.  दयाशंकर अवधेश प्रजापती (८, कोराडी) असे मृत मुलाचे नाव आहे.अवधेत प्रजापती हे मोलमजुरी करतात. त्यांना दयाशंकर (८) आणि कैलास (१२) अशी दोन मुले आहेत. बुधवारी दुपारी ते पतंग उडवायला घराबाहेर पडले. दोघेही महादुलाजवळील मैदानावर गेले. त्यांची पतंग कुणीतरी कापली. त्यामुळे ते कालव्याच्या शेजारी बसले होते. काही वेळात एक कापलेली पतंग खाली येत होती. ती पतंग पकडण्यासाठी दया आणि कैलास हे दोघेही पळायला लागले.

मात्र, पतंगाच्या नादात दोघेही कालव्याच्या पाण्यात पडले. काही नागरिकांना ते पाण्यात गटांगळ्या खाताना दिसले. नागरिकांनी मदतीस धाव घेईपर्यंत दयाशंकर  वाहून गेला. नागरिकांनी कैलासला  वाचवले. माहिती मिळताच कोराडी पोलिसांचे पथक पोहचले. एसीपी संतोष खांडेकर यांच्या नेतृत्वातील पथक वाहून गेलेल्या मुलाचा शोध घेत होते. गेल्या दोन दिवसांपासून मृतदेह सापडत नव्हता. शेवटी जगदीश खरे यांना शुक्रवारी सायंकाळी बोलाविण्यात आले. त्यांनी चार तास परिश्रम घेतले. अखेर कोराडी मंदिराच्या व्हीआयपी प्रवेशद्वाराजवळ मृतदेह गवसला. या प्रकरणी कोराडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली