भंडारा –-भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिल्यामुळे अपघात (Accident) झाला. या अपघातात दुचाकीवरील गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहे. भंडारा शहरातील राजीव गांधी चौकात ही दुर्देवी घटना घडली. या अपघातानंतर संतप्त नागरिकांकडून टिप्परची तोडफोड करण्यात आली. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.
बहिणीसोबत घराकडे जाणाऱ्या भावाच्या दुचाकीला भरधाव आलेल्या टिप्परने (क्रमांक MH 36 AA 3381) जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील प्रेग्नेंट बहिणीचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर, भाऊ गंभीर जखमी झाला. ही घटना भंडारा शहरातील राजीव गांधी चौकात शुक्रवार रात्री 10.30 वाजताच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती होताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली आणि संताप व्यक्त करताना रास्तारोको करीत वाहतूक थांबवून रोष व्यक्त केला. यावेळी संतप्त नागरिकांनी टिप्परची तोडफोड करीत पेटवण्याचा प्रयत्न केला.
भंडारा पोलिसांनी जमावाला केलं शांत –
भंडारा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत नागरिकांना त्यापासून रोखलं. भंडारा पोलिसांमुळे संतप्त जमावावर नियंत्रण मिळण्यात आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. अफसाना शेख (30) असे मृतक बहिणीचं नाव आहे. तर, कलीम शेख (35) असे गंभीर जखमी भावाचं नाव आहे. सुमारे दीड तासानंतर नागरिकांचा रोष शांत झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.