यवतमाळ : प्रकल्प अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून गृह प्रमुखाने शासनाची जवळपास २० लाखाने फसवणूक केली. ही धक्कादायक घटना यवतमाळ शहरातील रंभाजी नगरात असलेल्या शासकीय मुलींचे वसतिगृह क्रमांक ३ येथे उघडकीस आली. या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. राजू राठोड (५२ वर्ष रा. रूद्राक्ष नगर, जांबरोड) असे गुन्हा नोंद करण्यात आलेल्या गृह प्रमुखाचे नाव आहे.शहरातील रंभाजी नगरात शासकीय मुलींचे वसतिगृह क्रमांक ३ आहे. त्या ठिकाणी राजू राठोड हा गृह प्रमुख म्हणून कार्यरत होता. गृह प्रमुखाने २८ जानेवारी २०२२ ते १ ऑगस्ट २०२३ या दरम्यान आपल्या पदाचा गैरवापर केला. तसेच प्रकल्प अधिकारी यांची बनावट मोहर आणि स्वाक्षरी करून वेगवेगळी देयके कोषागर कार्यालयात सादर केली. ही देयके आहरीत करून शासनाच्या महसुलात १९ लाख ७६ हजार ९७६ रुपयांचा अपहार केला. या प्रकरणी आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील गृहपाल सचिन आजनकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोहारा पोलीस ठाण्यात राजू राठोड याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोहारा पोलीस करत आहे.