बुलढाणा: एसटी महामंडळाची बस व मालवाहू वाहनाची धडक झाल्याने एक प्रवासी ठार तर किमान १५ प्रवासी जखमी झाले. भीषण धडकमुळे बसचा पुढील भाग चेपला असून चालकाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.चिखली ते मेरा खुर्द दरम्यान असलेल्या रामनगर फाट्याजवळ आज शुक्रवारी सकाळी हा भीषण अपघात झाला. खासगी (ट्रॅव्हल) बसला ‘ओव्हरटेक’ करण्याच्या नादात महाराष्ट्र परिवहन महामंडळाची शयनयान बस ट्रॅव्हलसमोर असलेल्या ट्रकला मागून धडकली.
या अपघातात एसटी बस चालकाचे पाय मोडले असून एका २५ वर्षीय प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. किमान १५ प्रवासी जखमी आहेत. महाराष्ट्र परिवहन महामंडळाची पुणे ते शेगाव ही शयनयान बस (एम एच १४, एल बी ०५४४) पुण्यावरून शेगावला येत होती. रामनगर फाट्याजवळ खासगी ट्रॅव्हलला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना ट्रॅव्हलसमोर आलेला मालवाहू ट्रक अचानक ‘लेन’ बदलून एसटी बसच्या समोर आला. एसटी बस ओव्हरटेक करीत असल्याने वेगात होती, ती साखरेची वाहतूक करीत असलेल्या ट्रकला मागील बाजूस धडकली. दुर्घटनेनंतर मालवाहू वाहनाचा चालक वाहन जागेवर सोडून फरार झाला आहे. घटनास्थळी अंढेरा ठाणेदार विकास पाटील दाखल झाले.