*जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनखाली सहकार व पोलीस विभागाच्या पथकाची कारवाई
वाशिम,दि.९ : तालुक्यातील अवैध सावकारी व्यवहारासंबंधीच्या प्राप्त तक्रारीच्या चौकशीसाठी सहकार व पोलीस विभागाच्या पथकाने दोन व्यक्तींविरुद्ध शुक्रवारी झडतीची कार्यवाही करण्यात आली.
यात वाशिममधील गजानन कव्हर आणि दिपक गाडे या दोन गैरअर्जदारांविरुद्ध करण्यात आलेल्या कार्यवाही दरम्यान कथीत अवैध सावकारी व्यवहारासंबंधी पुढील चौकशीसाठी त्यांची स्थावर मालमत्तेची कागदपत्रे, खरेदी खते ताब्यात घेण्यात आलेली आहेत. तसेच एका प्रकरणात कोरे बाँड, धनादेश इत्यादी कागदपत्रे ताब्यात घेण्यात आलेली आहेत. या अनुषंगाने सावकारी कायद्याअंतर्गत पुढील चौकशी करण्यात येत आहे.
ही कार्यवाही जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस, पोलीस अधीक्षक अनुज तारे, अमरावतीचे विभागीय सहनिबंधक शंकर कुंभार यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणाखाली जिल्हा उपनिबंधक दिग्विजय राठोड यांनी पार पाडली आहे.
या कार्यवाहीमध्ये सहायक निबंधक प्रशासन आर. आर. सावंत, सहायक निबंधक एम. डी. कच्छवे यांनी पथक प्रमुख म्हणुन कामगीरी केली. या दोन पथकामध्ये रिसोडचे सहायक निबंधक अक्षय गुट्टे, सहकार अधिकारी पी. एन. झळके, सहकार अधिकारी बी. बी. मोरे, मालेगावचे सहकार अधिकारी के. जी. चव्हाण, मुख्य लिपीक पी. आर. वाडेकर, एस. पी. रोडगे, सहायक सहकार अधिकारी एम. जे. भेंडेकर, वरिष्ठ लिपीक एस. जी. गादेकर, कनिष्ठ लिपीक बी. ए. इंगळे, मदतनीस व्ही. ए. इंगोले यांनी सहायक म्हणून कामकाज केले.
वाशिम जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी अवैध सावकारी व्यवहार करणाऱ्यावर प्रभावी नियंत्रण व कार्यवाही करण्यासाठी सहकार विभागाचे जिल्हा निबंधक (सावकारी) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशिम व सावकाराचे सहायक निबंधक तथा सहायक निबंधक, सहकारी संस्था, वाशिम या कार्यालयाकडे गोपनिय स्वरुपाच्या तक्रारी दाखल करुन अशा व्यक्तींचीमाहिती द्यावी. तक्रारदाराचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा निबंधक दिग्विजय राठोड यांनी केले आहे.